कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या ‘पडेगाव पॅटर्न’ची रंगली चर्चा : बारा तासानंतरही आग कायम
छत्रपती संभाजीनगर : Harsul Waste Processing Plant Fire : दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी असल्याने शहरातील महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्प केंद्रावर कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या घटनाही आता नित्याच्याच झाल्या आहेत. पडेगाव प्रक्रिया प्रकल्प केंद्रानंतर बुधवारी (दि.१८) पहाटे हर्सूल केंद्रावरील कचऱ्याला आग लागली. याठिकाणी १५ हजार चौ.फुट आकाराचे तीन शेड उभारलेले असून, यातील सुका कचरा आगीमुळे जळाला. अग्निशमन विभागाने धाव घेत पाण्याचा मारा करून दहा-बारा तासांत आग आटोक्यात आणली. या आगीने परिसरात प्रचंड धूर पसरला, तर दुसरीकडे सुका कचऱ्याचे रुपांतर ओल्या कचऱ्यात झाले. आग लागली कि लावली, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ‘पडेगाव पॅटर्न’ आता हर्सूलमध्येही राबविण्यात येत आहे का?, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत.
गेल्यावर्षी पडेगाव येथील केंद्रावरील कचरा दिवाळीत पेटला होता, त्यानंतर महिनाभर परिसरातील नागरिकांना धूराचा त्रास सहन करावा लागला होता. तर यंदा दिवाळी संपताच हर्सूल येथील प्रक्रिया प्रकल्प केंद्रावरील कचरा पेटला आहे. याठिकाणी १५०० चौ.फुटाचे तीन शेड तयार केलेले असून, यातील दोन शेडमध्ये ओल्या कचऱ्यावर तर एका शेडमध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होते. बुधवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास सुका कचरा साचलेल्या शेडमध्ये आग लागल्याने धूर निघत असल्याचे सुरक्षारक्षकाचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती प्रकल्प कंत्राटदार किशन भाटी यांना दिली. त्यांनी पहाटे ४:३५ मिनिटांनी अग्निशमन केंद्राला कळविले, त्यानंतर पदमपुरा, एन ९ आणि सिडको या तिन्ही अग्निशमन केंद्रावरील पथके हर्सूलकडे रवाना झाली. उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी पहाटेच केंद्रावर पोहोचत मदतकार्याला वेग दिला.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनीही केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. शेडमध्ये सुका कचरा असल्याने आगीने पेट घेत संपूर्ण शेड कवेत घेतले. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, रॅपर्स, पुठ्ठा आदी असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला खासगी टँकरने लाखो लिटर पाणी पुरवावे लागले. सुमारे १२५-१५० टँकर पाणी लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे. दुपारी तीन-साडे तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
कचरा वेगळा करून पसरणारी आग थांबवली
आगीत पत्र्याचे शेड, प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या मशनरीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे झालेल्या नुकसान हे १ कोटींपर्यंत असल्याचा अंदाज आहे. आग लागल्यानंतर कचऱ्यातील फटाके फुटत होते, त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी धावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण होते. आग पसरू नये, यासाठी जेसीबीने कचऱ्याचे ढिग वेगवेगळे करण्यात आले. त्यामुळे आग नियंत्रणात आणता आली. या केंद्रावर कचरा घेऊन येणारे कंटेनर शहरातील इतर केंद्राकडे वळविण्यात आले, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.
त्रुटींकडे दुर्लक्ष…
अग्निशमन विभागाने गेल्यावर्षी प्रकल्प केंद्रावरील फायर सेफ्टीबाबत पाहणी केली होती. यावेळी आढळलेल्या त्रुटींचा अहवालही दिला होता. मात्र त्यानंतर या त्रुटी दूर केल्याचे कळविले नाही. या केंद्रासाठी कंत्राटदाराने सन २०२२-२३ मध्ये अग्निशमन विभागाकडून एनओसी घेतलेली आहे, त्यानंतर नुतनीकरणही केलेले नाही, त्याची फाईल आमच्याकडे आलेली नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली. वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल पंप आणून ठेवलेला आहे, मात्र आगीमुळे वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर हा पंप काही सुरू झाला नाही. केंद्रावर ७५ लाख लिटर क्षमतेचे दोन पाण्याचे हौद आहेत, असे असतानाही, शेकडो खासगी टँकरने पाणी का मागवावे लागले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हर्सूल येथील प्रक्रिया प्रकल्प केंद्रावर सीसीटीव्ही लावलेले आहेत. सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या सर्व घटना कैद झाल्या असतील. केंद्रावर आग नेमकी कधी लागली, कशी लागली, याची उत्तरे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासल्यानंतर समोर येईल.
चौकशी करणार : आयुक्त
पडेगाव आणि हर्सूल येथील घटनांमध्ये फरक आहे. पडेगाव येथे साचलेला कचरा आहे, हर्सूल येथील कचऱ्यावर रोज प्रक्रिया होते. ओल्या कचऱ्याचे खत तयार केले जाते, तर सुका कचऱ्याचे गठ्ठे तयार करून ते प्रक्रियेसाठी नेले जातात. दिवाळीत आठ-दहा दिवस हे गठ्ठे नेणाऱ्या गाड्या आल्या नाहीत, त्यामुळे सुका कचरा साचला होता. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमधून घेण्यात येईल. यापुढे अशा घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आग लागल्याचे लक्षात येताच वीज पुरवठा खंडीत करून आग विझविण्यासाठी यंत्रणा धावली. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, त्यात जे समोर येईल त्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाईल. : अमोल येडगे, आयुक्त, मनपा.
Read About : Mahavitaran Fake Recruitment : 23 हजार जागांची जाहिरात खोटी; महावितरणचा खुलासा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.