अमेरिकेतील तीन विद्यापीठांच्या संशोधनातून खुलासा; पर्यावरणपूरक प्लास्टिक निर्मितीसाठी संशोधन उपयुक्त ठरण्याची शक्यता
वॉशिंग्टन : Cellophane Bees Natural Plastic सेलोफेन मधमाश्या जमिनीखालील आपल्या घरट्यांच्या भिंती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या शरीरातून एक खास प्रकारचे नैसर्गिक प्लास्टिक तयार करतात. विशेष म्हणजे, मानवनिर्मित प्लास्टिकच्या तुलनेत हे प्लास्टिक मातीत अत्यंत वेगाने विघटित (नष्ट) होते. अमेरिकेतील तीन प्रमुख विद्यापीठांच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा महत्त्वाचा उलगडा झाला असून, भविष्यात पर्यावरणपूरक प्लास्टिक बनवण्यासाठी याचा मोठा उपयोग होऊ शकतो.
मधमाश्या प्लास्टिक कसे तयार करतात?
जमिनीत बिळे करून राहणाऱ्या मादी सेलोफेन मधमाश्या आपल्या नांगीच्या जवळील ग्रंथीतून एक विशेष द्रव स्रवतात. हा द्रव त्या आपल्या घरट्याच्या भिंतींवर पसरवतात, ज्यामुळे त्याचे रूपांतर एका पारदर्शक आणि पातळ प्लास्टिकच्या आवरणात (पॉलिस्टर) होते. या आवरणात ७५ टक्के प्लास्टिक आणि २५ टक्के रेशीम असते. हे प्लास्टिक जगातील एकूण प्लास्टिकपैकी एक तृतीयांश असलेल्या पॉलीथिलीन सारखेच मजबूत असते.
मातीत वेगाने विघटित होण्याची क्षमता
युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा, युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी आणि व्हर्जिनिया टेकच्या संशोधकांनी वर्षभर या घरट्यांचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की, पहिले चार महिने हे आवरण लवचिक राहते, मात्र पिल्लू मोठे होऊन बाहेर पडल्यानंतर ७ ते ११ महिन्यांत हे प्लास्टिक मातीत सहज कुस्करून नष्ट होते. याउलट, प्रयोगशाळेत बनवलेले तत्सम प्लास्टिक कडक कंपोस्टिंग प्रक्रियेतही २८० दिवसांत केवळ १८ टक्केच नष्ट होते.
प्लास्टिक कचऱ्यावर प्रभावी उपाय
मधमाश्यांच्या या प्लास्टिकमधील रासायनिक रचना आणि त्यातील काही नैसर्गिक विकरे हे प्लास्टिक वेगाने नष्ट करण्यास मदत करतात. जर शास्त्रज्ञांना मधमाश्यांची ही पद्धत कॉपी करण्यात यश आले, तर मजबूत पण वापरानंतर मातीत सहज विरघळणारे प्लास्टिक तयार करणे शक्य होईल, ज्यामुळे जगभरातील प्लास्टिक कचऱ्याची गंभीर समस्या सुटू शकेल.
Read About : Firecracker Smoke and Air Pollution – फटाक्यांचा धूर हवेतून लवकर गायब का होत नाही?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.