Ad Advertisement Ad Advertisement

Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin – बॉलिवूडला नवी जोडी! सुब्हान-ऐराहचे पदार्पण

शशांक खेतान यांचा प्रेम आणि सूडावर आधारित चित्रपट ९ जुलै २०२७ ला प्रदर्शित होणार

मुंबई : Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin – बॉलिवूडमध्ये आणखी एका नव्या जोडीची एन्ट्री होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुब्हान आणि अभिनेता रोहित रॉय यांची मुलगी ऐराह लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या आगामी ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, ९ जुलै २०२७ ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

प्रेमकथेत असेल सूडाचा रंग

शशांक खेतान यांनी चित्रपटाच्या घोषणेसोबत एक खास व्हिडिओही प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोन प्रेमींचे रोमँटिक क्षण पाहायला मिळतात. मात्र, पुढे अचानक वातावरण बदलते आणि कथेत काहीतरी वेगळे घडणार असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून त्यात उत्कटता, संघर्ष आणि सूडनाट्यही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप फारशी माहिती दिलेली नाही. सुब्हान आणि ऐराह यांच्या व्यक्तिरेखा कशा असतील, त्यांची प्रेमकहाणी कोणत्या वळणावर जाणार आणि त्यात सूडाचा संबंध काय असेल, याबाबत सध्या उत्सुकता आहे.

सुब्हान आणि ऐराहचा पहिलाच चित्रपट

सुब्हान हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांचा मुलगा आहे. तर ऐराह ही अभिनेता रोहित रॉय आणि मानसी रॉय यांची मुलगी आहे. दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबांमधून येत असले, तरी प्रमुख कलाकार म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या दोघांना मोठ्या पडद्यावर आणण्याची जबाबदारी शशांक खेतान यांनी घेतली आहे. यापूर्वीही त्यांनी नव्या कलाकारांच्या जोड्या प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत.

नव्या जोड्यांसाठी ओळखले जातात शशांक खेतान

शशांक खेतान यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी सादर केली होती. त्यानंतर ‘धडक’ या चित्रपटातून ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांना एकत्र आणले. या दोन्ही चित्रपटांमधील जोड्यांची चांगलीच चर्चा झाली होती. आता सुब्हान आणि ऐराह यांच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा नवी जोडी प्रेक्षकांसमोर आणत आहेत.

नव्या निर्मिती संस्थेची सुरुवात

‘ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं’ हा चित्रपट शशांक खेतान, अमित चंद्रा आणि नलिनी दत्ता खेतान यांनी सुरू केलेल्या ‘२१४ एंटरटेनमेंट’ या नव्या निर्मिती संस्थेचा पहिला महत्त्वाचा प्रकल्प आहे. अमित चंद्रा, नलिनी दत्ता खेतान, करिश्मा ठक्कर आणि शशांक खेतान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शशांक खेतान यांनीच केले आहे. प्रेम, उत्कटता आणि सूड अशा वेगळ्या विषयांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटातून सुब्हान आणि ऐराह यांची जोडी प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट ९ जुलै २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Read About: Call Me Bae Season 2 – ‘दोन प्रेमी, एक बे!’ अनन्याच्या आयुष्यात पुन्हा रंगणार लव्ह ड्रामा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.