Ad Advertisement Ad Advertisement

Gold and Silver Prices Crash – सोने-चांदीच्या दरात मोठी पडझड!

सोने १.२२ लाख प्रति १० ग्रॅम तर चांदी १.४८ लाख किलोवर; जानेवारीतील विक्रमी तेजीला नोव्हेंबरमध्ये ब्रेक, सोन्याच्या दरात ४ टक्के, तर चांदीत ६ टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली : Gold and Silver Prices Crash जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण, अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याच्या शक्यतेमुळे सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. दोन्ही मौल्यवान धातूंचे दर २०२६ मधील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात सुमारे ४ टक्क्यांची, तर चांदीच्या दरात तब्बल ६ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर घसरून १ लाख २२ हजार ४३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर चांदीचा दर ६ टक्क्यांनी कोसळून १ लाख ४८ हजार ३४ रुपये प्रति किलोवर पोहोचला. अमेरिकेतील आर्थिक घडामोडी, व्याजदरवाढीच्या अपेक्षा आणि चलनातील चढ-उतार यांचा आगामी काळात मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ॲस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन देसाई यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी घसरण आणि अस्थिरता पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता, डॉलरची मजबुती आणि जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत यामुळे दोन्ही धातूंच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात अधिक घसरण झाली आहे.

दरातील घसरणीमुळे आतापर्यंत खरेदीसाठी अनुकूल भावाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, किरकोळ बाजारातील मागणी अद्याप स्थिर आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणि कमी प्रमाणात सोने-चांदी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. जागतिक घडामोडींबाबत स्पष्टता येईपर्यंत बाजारातील सावध भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे.

जानेवारीत विक्रमी उच्चांक, नोव्हेंबरमध्ये मोठी घसरण

यंदा २९ जानेवारी रोजी सोन्याने १ लाख ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीने ४ लाख ४ हजार ५०० रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर आता दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कोटक निओचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च विभागाचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांच्या मते, मौल्यवान धातूंच्या दरातील घसरण ही केवळ सोने-चांदीपुरती मर्यादित नसून जागतिक वित्तीय बाजारातील व्यापक विक्रीचा तो परिणाम आहे. गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी आणि रोख तरलतेसाठी अमेरिकन डॉलरकडे वळत आहेत. त्यामुळे सोने-चांदीसह तांबे, अन्य औद्योगिक धातू, शेअर बाजार आणि क्रिप्टोकरन्सीमध्येही विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.

अमेरिकन डॉलर निर्देशांक १०४ वर

अमेरिकन डॉलर निर्देशांक १०४ च्या जवळ पोहोचला असून, ही मागील १९ महिन्यांतील उच्च पातळी आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवेल, अशी अपेक्षा बाजारात जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील परतावा कमी होत असतानाही सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. यावरून गुंतवणूकदारांमध्ये रोख रक्कम मिळविण्याची किती घाई आहे, हे स्पष्ट होते.

सट्टेबाज गुंतवणूकदारांकडूनही विक्री

बॅनर्जी यांच्या मते, सध्या सट्टेबाज गुंतवणूकदार सोने-चांदीमधील आपली गुंतवणूक कमी करत आहेत. काही व्यापारी आणि साठाधारक रोख रक्कम उभी करण्यासाठी आपल्याकडील साठ्याची विक्री करत असण्याची शक्यता आहे. दर आणखी घसरण्याच्या भीतीने उत्पादकांकडूनही संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हेजिंग केले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे बाजारातील विक्रीचा दबाव आणखी वाढत आहे. जानेवारीमध्ये सट्टेबाज गुंतवणूकदारांच्या मोठ्या खरेदीमुळे सोन्या-चांदीचे दर झपाट्याने वाढले होते. आता मात्र त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू झाल्याने दरांवरील दबाव वाढला आहे.

चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

बाजारात दर मोठ्या प्रमाणात घसरूनही लगेच खरेदी वाढेलच असे नाही. विक्रीची घाई आणि रोख रकमेची गरज अधिक तीव्र असेल, तर खरेदीदारांना आकर्षक वाटणाऱ्या पातळीवरही दर घसरत राहू शकतात. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीच्या बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

Read About : Sovereign Gold Bond Redemption – सॉव्हरेन गोल्ड बॉण्डच्या मुदतपूर्व परतफेडीचा दर जाहीर; गुंतवणूकदारांना प्रति युनिट 13,499 रुपये

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.