Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Murder Cases – पत्नीचा खून करून पसार पतीची पेटवून घेत आत्महत्या

बीड जिल्ह्यातील घटना, विळ्याने वार करुन मुखेडला महिलेचा खून

उमापूर Marathwada murder cases : पत्नीच्या हत्येनंतर पसार झालेल्या पतीने स्वत:च्या शेतात पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली. विष्णू कदम असे मृत पतीचे नाव आहे. आनंदवाडी येथील भिवराबाई विष्णू कदम (५५) आणि त्यांचे पती विष्णू कदम यांच्यात पतीच्या अनैतिक संबंधांवरून वारंवार वाद होत होते. याच कारणावरून सोमवारी पहाटे घरात झोपलेल्या भिवराबाई यांच्या डोक्यात दगड घालून विष्णू कदम याने त्यांची हत्या केली होती.

या प्रकरणी मुलगा सुनील विष्णू कदम याच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर विष्णू कदम फरार झाला होता. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन इंगळे यांनी त्याच्या शोधासाठी पोलीस पथके नियुक्त केली होती. दरम्यान, मंगळवारी रात्री विष्णू कदम याने स्वत:च्या शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्यांच्या ढिगाला आग लावली आणि त्यात उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

विळ्याने गळ्यावर वार करुन महिलेचा खून

मुखेड (जि. नांदेड) : तालुक्यातील हसनाळ येथे कौटुंबिक वादातून एका महिलेचा विळ्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. १७) रात्री उघडकीस आली. लक्ष्मीबाई गदले असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई या हसनाळ येथे वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा दीपक व मोठा मुलगा शिवाजी हे कामानिमित्त पुणे येथे राहत होते. घराच्या वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त मावस भाऊ मारोती भुजंग गायकांबळे हा गावी आला होता. तो दि. ११ नोव्हेंबरपासून हसनाळ येथेच थांबलेला होता. दि. १७ रोजी सायंकाळी लक्ष्मीबाई यांनी मुलगा दीपक याला फोन करून मारोतीसोबत झालेल्या वादाबाबत सांगितले होते.

रात्री पुन्हा फोनवर संपर्क साधला असता मारोती विळा घासत असल्याचे तसेच घरातील देव्हारा उचलून फेकून दिल्याचे त्यांनी मुलाला सांगितले. यावेळी मारोतीपासून आपल्याला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, रात्री १०.१५ च्या सुमारास दीपक हा सासरवाडी बळेगावहून हसनाळ येथे घरी पोहोचला. त्यावेळी घराला आतून कडी लावलेली होती. खिडकीतून पाहिले असता मावस भाऊ मारोती याच्या हातात विळा व कुऱ्हाड असल्याचे दिसले. तर आई लक्ष्मीबाई या घरातील फरशीवर रक्ताच्या थारोळयात पडलेल्या आढळल्या.

ग्रामस्थांनी बोलावले पोलीस

घराचे दार आतून बंद असल्याने गावातील नागरिकांनी डायल ११२ वर संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दीपक चंदर गदले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी मारोती भुजंग गायकांबळेविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.