Ad Advertisement Ad Advertisement

Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य

मनपा आयुक्तांनी घेतली बैठक : जलसंचय जनभागीदारी अभियानांतर्गत गठित समितीच्या बैठकीत निर्णय

छत्रपती संभाजीनगर : Rain Water Harvesting : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, खालावत चाललेली भूजल पातळी सुधारण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिक, शासकीय व खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुले आणि मंगल कार्यालयांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी. यापूर्वी अशी व्यवस्था केलेली असल्यास तिची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी असा निर्णय बुधवारी (दि.१८) जलसंचय जनभागीदारी अभियानांतर्गत गठित समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या ‘जलशक्ती अभियान-कॅच द रेन’ अंतर्गत राज्य शासनाने ‘जलसंचय जनभागीदारी’ अभियान सुरू केले आहे. याअनुषंगाने महानगरपालिकेत गठित समितीची आढावा बैठक आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील सर्व सरकारी व खासगी अस्थापनांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग व जलपुनर्भरणाची व्यवस्था करावी, रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्यापूर्वीचे आणि उभारल्यानंतरची छायाचित्रे शासनाच्या संबंधित पोर्टलवर अपलोड करावीत.

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त येडगे यांनी केले. तसेच या सर्व आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय शहरातील सलीम अली तलाव, हर्सूल तलाव आणि सावंगी तलावांमधील गाळ काढणे, तलावांची स्वच्छता करणे व त्यांचे संवर्धन करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागांना निर्देश दिले.

मनपापासून सुरुवात;सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंधनकारक

महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये तसेच उद्याने, खुल्या जागा आणि खाम व सुखना नदी परिसरातील खुल्या जागांवर यापूर्वी उभारलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणांची तपासणी करावी, गरज असल्यास आवश्यक ती दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी अद्याप रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली नाही, अशा ठिकाणी नवीन यंत्रणा उभारण्यात यावी, असे निर्देशही आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. तसेच महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत स्वत:च्या राहत्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी. त्याबाबतची छायाचित्रे व आवश्यक पुरावे प्रशासनाकडे सादर करावेत, तीन महिन्यांनंतरही ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली नसेल, त्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

बांधकाम परवानगी देताना घेणार अनामत रक्कम

व्यावसायिक तसेच निवासी बांधकामांसाठी परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद करण्यात यावी, त्यासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात यावी, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित बांधकामधारकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारल्याचे आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर ही अनामत रक्कम परत द्यावी. तसेच गुंठेवारी प्रमाणपत्र देताना संबंधित मालमत्ताधारकाने व्यक्तिगत अथवा सामूहिक स्वरूपात रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याचे पुरावे सादर सादर केल्यानंतरच गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

Read About : Harsul Waste Processing Plant Fire – हर्सूल प्रक्रिया प्रकल्पातील सुका कचरा पेटला
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.