कॉप-३१ परिषद : पनामाच्या पर्यावरण मंत्र्यांचा घणाघात
अँटाल्या (तुर्किये) : Fossil Fuel Crisis – येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद ‘कॉप-३१’दरम्यान पनामाचे पर्यावरण मंत्री जुआन कार्लोस नवारो यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पेट्रोल उत्पादक देशांवर हल्ला चढविला. पेट्रोल माफियांनी अख्ख्या जगाला ओलीस ठेवले आहे. हे माफिया आपल्याला सांगतात की ते आपल्या भल्यासाठीच निसर्गाचा नाश करत आहेत आणि आपण वेड्यासारखे त्यावर विश्वास ठेवतो. आपण आपल्या अपहरणकर्त्यांच्या प्रेमात पडलो आहोत, असा घणाघात त्यांनी केला.
ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी जिवाश्म इंधनावरील आपला दृष्टीकोन समोर ठेवला. सध्या सुरू असलेल्या कॉप-३१ मध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. परिषदेचे अवघे दोन दिवस बाकी असताना, जीवाश्म इंधनावर नियंत्रण मिळवणे आणि जागतिक तापमान वाढीवर मात करणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्याप कोणतेही एकमत झालेले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या संथ कारभाराला कंटाळून काही देशांनी स्वत:हून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जीवाश्म इंधनापासून मुक्ती मिळवण्यासाठी ३० देशांनी एका स्वतंत्र करारावर सह्या केल्या आहेत.
परिषदेसमोरील अडचणी
विकसनशील देशांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी केवळ ५० दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा आहे. ‘जस्ट ट्रान्झिशन’ (हरित ऊर्जा निर्माण करताना कोळसा आणि गॅसवर काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराची काळजी घेणे) आणि हवामान निधीच्या मुद्द्यावर युरोपियन युनियनकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. २०३५ पयंर्त ३५% ऊर्जा विजेपासून निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, ही वीज कोळसा किंवा गॅसपासून बनवून नवीन जाळे तयार केले जाईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या विजेसाठी हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा स्पष्ट उल्लेख हवा, अशी मागणी होत आहे.
पुढची परिषद इथिओपियात
पुढची कॉप-३२ परिषद इथिओपिया येथे होणार असून, तेथील प्रतिनिधींनी फक्त कार्बन उत्सर्जन कमी करणे पुरेसे नसून झाडे लावून आणि निसर्गाचे रक्षण करून वातावरणातील कार्बन शोषून घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
Read About : Ajanta Hills Hydropower Project Protest – जल, जंगल, जमीन रक्षणासाठी मानवी साखळी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.