डिजिटल तिकीट तपासणीच्या युगात आरएसी कालबाह्य झाल्याचे मत
नवी दिल्ली : Indian Railways RAC System भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासणी प्रणालीत झालेल्या डिजिटल बदलांमुळे रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन अर्थात ‘आरएसी’ सुविधेची उपयुक्तता संपली असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका गटाने व्यक्त केले आहे. रेल्वे मंत्रालय ही सुविधा बंद करण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तांदरम्यान ही भूमिका समोर आली आहे.
आरएसी प्रणालीमध्ये एकाच बर्थवर दोन प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मात्र दोघांकडूनही पूर्ण तिकीट दर आकारले जातात. प्रवाशांची गैरसोय आणि पूर्ण भाडे आकारणीमुळे या व्यवस्थेवर अनेक दिवसांपासून टीका होत आहे. १९८३-८४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ए. बी. ए. गनी खान चौधरी यांनी प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासादरम्यान रिकाम्या होणाऱ्या जागा मिळाव्यात यासाठी ही सुविधा सुरू केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या तिकीट तपासनीसांकडे (टीटीई) संपूर्ण तिकीट प्रणालीशी जोडलेले ‘हँड हेल्ड टर्मिनल’ (एचएचटी) असतात. एखादा प्रवासी गैरहजर राहिल्यास टीटीई तत्काळ त्याची नोंद यंत्रणेत करतात आणि पुढील स्थानकावरून इतर प्रवाशांना ती जागा उपलब्ध होते. यामुळे टीटीईंच्या मनमानी कारभारालाही आळा बसेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२०१५ चा नियम काय आहे
२०१५ च्या नियमांनुसार प्रवासी गैरहजर राहिल्यास रेल्वेला कोणताही आर्थिक तोटा होत नाही. तसेच संसदेच्या लोकलेखा समितीने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालात पूर्ण बर्थ न मिळणाऱ्या आरएसी प्रवाशांना अंशत: परतावा (रिफंड) देण्याची शिफारस केली होती. तांत्रिकदृष्ट्या ही परतावा प्रक्रिया किचकट असल्याने आणि आधुनिक डिजिटल यंत्रणेमुळे आरएसी सुविधा रद्द करणे अधिक सोयीचे ठरेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या केवळ ‘वंदे भारत स्लीपर’ गाड्यांमध्ये आरएसी सुविधा नाही.
Read About : Maharashtra Wage Rules – राज्यात ‘महाराष्ट्र वेतन नियम, 2026’ लागू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.