Ad Advertisement Ad Advertisement

May 2024 Solar Storm : सौरवादळाने पृथ्वीचे अभेद्य किरणोत्सार विरोधी कवच भेदले!; किलर इलेक्ट्रॉन्सच्या संख्येत तब्बल ५,००० पट वाढ!

जपानच्या अरासे उपग्रहाने केली नोंद, उपग्रहांच्या सुरक्षेची चिंता वाढली

नवी दिल्ली : May 2024 Solar Storm पृथ्वीभोवती असलेले नैसर्गिक किरणोत्सार (रेडिएशन) विरोधी कवच अत्यंत शक्तिशाली सौरवादळात भेदले जाऊ शकते, असा धक्कादायक निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. मे २०२४ मध्ये आलेल्या शक्तिशाली सौरवादळामुळे पृथ्वीच्या आतील ‘व्हॅन ॲलन किरणोत्सार’ पट्ट्यात अतिऊर्जावान इलेक्ट्रॉन्सची संख्या तब्बल ५,००० पट वाढल्याचे आढळले. या कणांना ‘किलर इलेक्ट्रॉन्स’ म्हटले जाते.

हा अभ्यास ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतभारित कण अडकून राहतात. त्यामुळे ग्रहाभोवती डोनटच्या आकाराचे दोन रेडिएशन पट्टे तयार झाले आहेत. आतील पट्ट्यात प्रामुख्याने ऊर्जावान प्रोटॉन्स, तर बाहेरील पट्ट्यात सूर्याच्या हालचालींनी प्रभावित होणारे इलेक्ट्रॉन्स असतात. आतापर्यंत आतील पट्टा अतिऊर्जावान इलेक्ट्रॉन्सना रोखणारा जवळपास अभेद्य अडथळा मानला जात होता.

सौरवादळामुळे इलेक्ट्रॉन्सना मिळाली ऊर्जा

मे २०२४ मधील सौरवादळाला जी-५ म्हणजेच भूचुंबकीय वादळाच्या सर्वोच्च श्रेणीत स्थान देण्यात आले होते. या वादळामुळे पृथ्वीभोवतालच्या प्लाझ्मास्फिअरमधील थंड प्लाझ्माचे प्रमाण कमी झाले. परिणामी ‘कोरस वेव्ह्ज’ नावाच्या विद्युतचुंबकीय लहरींनी इलेक्ट्रॉन्सना प्रचंड ऊर्जा दिली. जपानच्या अरासे उपग्रहाने केलेल्या निरीक्षणात सुमारे तीन मेगाइलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत ५,००० पट वाढल्याचे दिसले. कमी ऊर्जेचे कण आधी आणि अधिक ऊर्जेचे कण पुढील २४ तासांत आढळले. यावरून हे इलेक्ट्रॉन्स आतील पट्ट्यातच अधिक ऊर्जावान झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

उपग्रह आणि अंतराळवीरांना धोका

हे इलेक्ट्रॉन्स प्रकाशाच्या वेग धारण करू शकतात. त्यामुळे उपग्रहांमधील संवेदनशील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होऊन त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. अंतराळवीरांनाही किरणोत्सर्गाचा धोका वाढू शकतो. ऑक्टोबर २०२४ पर्यंत या इलेक्ट्रॉन्सच्या पातळीत घट होत असल्याची नोंद अरासे उपग्रहाने केली. नागोया विद्यापीठातील योशिझुमी मियॉशी यांच्या नेतृत्वाखालील संशोधनामुळे अंतराळातील हवामानाचा अंदाज आणि अंतराळ मोहिमांची सुरक्षा सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Read About : Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.