Ad Advertisement Ad Advertisement

Anantashesha Shayi Vishnu : अनंतशेषशायी

Anantashesha Shayi Vishnu : आज कार्तिक शुद्ध एकादशी, म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची आज समाप्ती होते. भागवत पुराणानुसार या चार महिन्यांत क्षीरसागरात योगनिद्रेत लीन झालेले भगवान विष्णू जागे होतात. पुन्हा एकदा आपली विश्वप्रतिपालकाची भूमिका हिरिरीनं करू लागतात. विष्णू ही देवता आणि तिच्या विविध मूर्तींचा अभ्यास करताना त्यातल्या वैविध्यानं चकित व्हायला होतं. हा एकमेव देव आहे, ज्याची शयनमूर्ती सर्वाधिक लोकप्रिय आहे.

असा कसा हा झोपलेला देव असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. पण, पुराणांत विष्णूंच्या या अनंतशयनाचं एक अतिशय सुंदर वर्णन येतं. भगवान अनंतशेषावर पहुडलेले, योगनिद्रेत व्यग्र असतात. त्यात त्यांना स्वप्न पडतं, त्यात ही सगळी सृष्टी उत्पन्न होते. तिच्यात घडणारे सगळे व्यवहार बिनबोभाट तोवरच चालतात, जोवर हा विश्वाधार विश्व व्यापून दशांगुळे उरलेले विष्णू स्वस्थचित्तात झोपलेले आहेत.

त्याच्या स्वप्नातच हे संपूर्ण विश्व वावरत असल्यामुळे सहाजिकच हे जे काही आहे ज्याला आपण खरं मानतो, ते सारंच स्वप्न आहे. ते ‘त्या’चं स्वप्न आहे. तोच बघतोय आणि ‘त्या’च्यातचं विलीन होणार आहे, त्यामुळे जे आपल्याला सत्य भासतं ते ते सर्वस्वी भ्रम आहे, या शाश्वत सत्याची जाणीव करून देण्यासाठी हे चार महिने ‘त्या’च्या शयनाचे म्हणून सांगितले आहेत. हा योगनिद्राधीन अनंतशेषशायी विष्णू म्हणजे एक अद्भुत आहे. याच्या नि:श्वासातून वेद जन्मतात आणि नाभीतून उमलेल्या कमळात ब्रह्मदेव सृष्टीच्या निर्मितीचा कारखानाच टाकतात. हे दृश्य नेमकं कसं दिसत असावं याचा धांडोळा आजवर उपलब्ध असलेल्या सर्वांत प्राचीन मूर्तीपाशी येऊन थांबतो. उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील देवगड येथील गुप्तकालीन दशावतार मंदिराच्या दक्षिण भिंतीवर हा ‘अनंतशेषशायी विष्णू’ शिल्पित केलेला आहे.

अतिशय अभिरुचिपूर्ण अशा या शिल्पाला एकूण तीन स्तर आहेत – यातला सर्वात महत्त्वाचा म्हणून केंद्रस्थानी अनंतशेषावर निजलेले महाविष्णू आहेत. त्या नागाच्या वेटोळ्याला मूर्तिशास्त्रात ‘आभोग’ म्हणतात. गंमत अशी की, आजच्या अत्याधुनिक युगात रुग्णशैय्येवर दीर्घ काळ झोपून राहणाऱ्या रुग्णाला पाण्याच्या किंवा हवेच्या नळ्यांनी बनलेल्या गादीवर झोपवण्यात येतं, जेणेकरून त्याच्या शरीराच्या विशिष्ट अंगांवर सतत भार येऊन तिथे जखमा (बेडसोर्स) होऊ नयेत.

भारतीय मूर्तिकलेत अनंत शेषाचा हा आभोग अगदी या आधुनिक गादीसारखाच कोरलेला असतो; तर अशा या आरामदायक शैय्येवर एक हात उशाला घेऊन एका अलौकिक शांततेत निर्विकार भाव मुखावर असलेले हे नारायण जसे या शिल्पाच्या केंद्रकात आहेत, तसेच या विश्वाच्याही केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर आपल्या सात फण्यांनी शेषानं छत्र धरलेलं आहे. त्यांची चरणसेवा करणारी देवी लक्ष्मी तिच्या मागे भूदेवी आणि तिच्या समोर गरुड आहे. लक्ष्मीनं श्रीविष्णूंच्या पोटरीवर बोटांनी दिलेला दाब अगदी स्पष्ट जाणवतो. त्याच्या खालचा स्तर आहे तो विष्णूंच्या आयुध पुरुषांचा. त्यांचा हातातल्या शस्त्रांना मानवी रूप देण्यात आलेलं आहे.

भारतीय मूर्तीशास्त्रात विष्णूंची मुख्य आठ आयुधं मानली जातात – सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, पांचजन्य शंख, कमळ पद्म, नंदक खड्ग, शतचंद्र खेटक, शार्ङ्ग धनुष्य आणि अमोघ बाण. जेव्हा शिल्पाच्या रचनेत फक्त आयुधदेवतांची मालिका दाखवायची असते, तेव्हा प्रसंगानुरूप यातलं कमळ आणि शंख वगळून प्रमुख सहा शस्त्रांना मानवी रूपात प्रस्तुत करण्यात येतं, यातली गदा हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तिला स्त्रीरूपात गदादेवी म्हणून शिल्पण्यात येतं. या शिल्पात फण्याच्या अगदी खाली महाविष्णूंचा वरचा उजवा हात आहे, त्यात शंख कोरला असावा. जवळपास पंधराशे वर्षांचा काळ सरला आहे, त्यामुळे दगडांची झीज झाली आहे; पण तो शंख तिथेच असणं अपेक्षित आहे.

या शिल्पाच्या वरच्या स्तरात विष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळावर चतुर्मुख ब्रह्मदेव कमळासनात बसलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या बाजूला नंदीवर आरूढ शिव-पार्वती, ऐरावतावर बसलेला इंद्र, मयुरावर कार्तिकेय आणि मरुद्गण आकाशातून या सृष्टीच्या आरंभाचे साक्षीदार म्हणून पाहताना कोरले आहेत.

कोणत्याही आकाशगंगेच्या (Galaxy) मध्यभागी विसावलेले एक ‘निद्रिस्त महाकाय कृष्णविवर’ (Dormant Supermassive Black Hole) असतं, हे आधुनिक खगोलभौतिकी (Astrophysics) नं सिद्ध केलेलं आहे या दृष्टिकोनातून शिल्पाकडे बघावं. संस्कृत व्याकरणानुसार ‘वैकुंठ’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘विशेषणे कुंठित:’ अशी केली जाते म्हणजे असे स्थान, जेथे बाह्य जगातील सर्व गती, प्रकाश आणि काळाची धाव विशेष प्रकारे स्तब्ध (कुंठित) होते. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार, कृष्णविवराच्या (Black Hole) सीमेवर (Event Horizon) आणि केंद्रस्थानी (Singularity) नेमके हेच घडते. तेथील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे काळ जणू थबकतो आणि प्रकाशही बाहेर पडू शकत नाही.

आपल्या मिल्की वे (क्षीरमार्ग)सारख्या प्रौढ आकाशगंगेच्या मध्यभागी एक अतिविशाल कृष्णविवर असते. जेव्हा ते आजूबाजूचे तारे गिळंकृत करत नसते, तेव्हा ते अत्यंत शांत, म्हणजेच ‘निद्रिस्त’ (Dormant) अवस्थेत असते. देवगडच्या शिल्पात क्षीरसागराच्या (आकाशगंगेच्या) मध्यभागी योगनिद्रेत शांत पहुडलेले विष्णू हे त्याच निद्रिस्त कृष्णविवराचे प्रतीक आहेत. ते स्वत: कोणतीही हालचाल न करता निश्चल पडून आहेत; पण त्यांच्याच गुरुत्वाकर्षणामुळे संपूर्ण आकाशगंगेची ‘धारणा’ (संतुलन) टिकून आहे.

तर खगोलशास्त्रानुसार विश्वाच्या निर्मितीच्या पहिल्या क्षणी म्हणजेच T0 काळ आणि अवकाश (Spacetime) अस्तित्वात आले. विश्वातले आकाशपिंड निर्माण होतात आणि नष्टही. पण प्रलयानंतरही ‘शेष’ उरतो, तो हा अखंड, अविनाशी काळ! सापेक्षतावादानुसार कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीचा काळ-अवकाश सरळ न राहता गोल वेटोळ्यांसारखा वक्र (Curved Spacetime) होतो. त्याचप्रमाणे या शिल्पाच्या संदर्भात बिगबँगनं सुरू झालेलं हे विश्व आणि त्यात गुरुत्वाकर्षणाने बांधलेली पृथ्वी म्हणजे लक्ष्मी!

आजच्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ही बाविसावी शिल्पगाथा त्या अनंतशेषशायीला समर्पित!!!

डॉ. रमा गोळवलकर
संपर्क : ९४२२११४६२०

Read About : Gravitational Waves : अंतराळाची अदृश्य कंपने: गुरुत्वाकर्षण तरंग
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.