राज्यात ६१ विस्तारित ज्ञानमंडळे स्थापन होणार, विद्यापीठे व संशोधन संस्थांकडे पालकत्व; अठरा हजार नोंदींचे अद्ययावतीकरण व प्रलंबित खंड पूर्ण करणार
मुंबई : Marathi Encyclopaedia Update Maharashtra महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कामांना गती देण्यासाठी राज्यभरात ६१ किंवा त्याहून अधिक विस्तारित ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा शासन निर्णय मराठी भाषा विभागाने जारी केला आहे. राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक आणि संशोधन संस्थांची या ज्ञानमंडळांसाठी पालकसंस्था म्हणून निवड केली जाणार असून, विश्वकोशाच्या पहिल्या ते विसाव्या खंडांतील १८ हजार २४४ नोंदींचे अद्ययावतीकरण आणि प्रलंबित २२वा परिभाषा व २३वा नकाशा खंड प्रकाशित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मानव्यविद्या क्षेत्रातील ३५ आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील २६ अशा एकूण ६१ विषयांसाठी ही मंडळे कार्यरत राहतील. या माध्यमातून १४ ते १८ वयोगटासाठीच्या कुमार विश्वकोशाचे उर्वरित ११ खंड, ६ ते १३ वयोगटासाठी बालविश्वकोश आणि ऑलिम्पिक कोश विकसित केले जातील. लेखक, समीक्षक, भाषांतरकार, मुद्रितशोधक, समन्वयक आणि कलासंपादक पदांसाठी वय, लिंग, प्रदेश किंवा शैक्षणिक अर्हतेची कोणतीही अट ठेवलेली नाही.
नोंदीनुसार चार हजार रुपयांपर्यंत मानधन
विश्वकोश कामासाठी vishwakoshnondpranali.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुलाखतीने निवड होईल. लेखकांना २५० शब्दांपर्यंतच्या नोंदीसाठी १,००० रुपये, तर ७५० पेक्षा अधिक शब्दांसाठी ४,००० रुपये मानधन मिळेल. समीक्षक, भाषांतरकार व मुद्रितशोधकांना प्रतिनोंद ५०० ते २,००० रुपये, समन्वयकांना नोंद प्रकाशित झाल्यावर १,००० रुपये, तर अभ्यागत संपादकांना प्रत्यक्ष उपस्थितीसाठी प्रतिदिन २,००० व ऑनलाइन कामासाठी १,५०० रुपये मानधन देण्याची तरतूद आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लेखनास मनाई
नोंदींचे लेखन मानवीकृत असावे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यांत्रिक पद्धतीने लेखन करू नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. अलंकारिक भाषेऐवजी वस्तुनिष्ठ व प्रमाण मराठीचा वापर बंधनकारक आहे. समीक्षक, मुद्रितशोधक, कलासंपादक आणि विषयपालकांच्या तपासणीनंतर मंडळाच्या अध्यक्षांची अंतिम मान्यता मिळाल्यावरच नोंदी संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.
Read About : EPFO New PF Withdrawal Rules 2026 -पीएफधारकांना मोठा दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.