Ad Advertisement Ad Advertisement

AT 2016blu Black Hole Discovery : दर 113 दिवसांनी ताऱ्यात महाविस्फोटाचा भास; कृष्णविवराच्या साथीदारामुळे 15 वर्षांचे गूढ उलगडणार?

पृथ्वीपासून सुमारे तीन कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या महाकाय ताऱ्याचे ११३ दिवसांच्या अंतराने होणारे तेजस्वी उद्रेक चर्चेत

वॉशिंग्टन : AT 2016blu Black Hole Discovery अंतराळातील एका महाकाय ताऱ्याचे अचानक प्रचंड तेजस्वी होणे आणि पुन्हा मंदावणे यामागील रहस्य अखेर उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नासाच्या चंद्र एक्स-रे वेधशाळेने केलेल्या निरीक्षणांनुसार, या ताऱ्याभोवती कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन तारा फिरत असावा. हा साथीदार जवळ येताना ताऱ्यातील पदार्थ स्वत:कडे खेचतो आणि त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते.

‘एटी २०१६ ब्लू’ असे नाव असलेला हा तारा पृथ्वीपासून सुमारे तीन कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एनजीसी ४५५९ या सर्पिलाकार आकाशगंगेत आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या किमान ३३ पट असल्याचा अंदाज आहे. २०१२ ते २०२६ या काळात खगोलशास्त्रज्ञांनी त्याचे किमान २७ तेजस्वी उद्रेक नोंदवले. विशेष म्हणजे, हे उद्रेक साधारण ११३ दिवसांच्या अंतराने घडतात.

हा तारा ‘ल्युमिनस ब्ल्यू व्हेरिएबल’ प्रकारातील असून त्याची चमक बदलत असते. त्याचे उद्रेक सुपरनोव्हा स्फोटांसारखे दिसतात; मात्र प्रत्येक वेळी तारा नष्ट न होता टिकून राहतो. त्यामुळे त्याला ‘सुपरनोव्हा इम्पोस्टर’ असेही म्हटले जाते.

चंद्र दुर्बिणीने दिला महत्त्वाचा पुरावा

मार्च २०२६ मधील निरीक्षणांत या ताऱ्याकडून निघणारे क्ष-किरण २००१ आणि २००२ मधील नोंदींच्या तुलनेत किमान शंभरपट अधिक तीव्र असल्याचे आढळले. संशोधकांच्या मते, दोन्ही खगोलीय वस्तू लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. दर ११३ दिवसांनी साथीदार ताऱ्याजवळ येतो आणि त्यातील वायू खेचतो. हा पदार्थ प्रचंड वेगाने फिरताना तापतो आणि तीव्र क्ष-किरण निर्माण करतो. त्यामुळे सभोवतालचा वायू तापून चमकतो.

व्हर्जिनिया विद्यापीठातील मोजगान आघाखानलू यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन ‘द ॲस्ट्रोफिजिकल’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या प्रकारच्या ताऱ्याकडून क्ष-किरण उत्सर्जन आढळण्याची आणि त्याला कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन ताऱ्यासारखा साथीदार असण्याची ही पहिली नोंद असल्याचे संशोधक सांगतात. मात्र साथीदार नेमका कोणता आहे, हे निश्चित होण्यासाठी पुढील निरीक्षणे आवश्यक आहेत.

Read About : Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.