Rebellion and Music : विद्रोहाची विचारशील अभिव्यक्ती करणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि बोरिस पास्तरनाक या तीनही प्रतिभावंतांचे संगीत या कलेशी नाते होते.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय सत्य सांगणाऱ्या आणि त्यासाठी उपेक्षा, अवहेलना सहन करीत शिक्षा भोगणाऱ्या विद्रोही भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांना संगीत या कलेविषयी विलक्षण प्रेम होते.
गॅलिलिओचे वडील विन्चॅन्सो गॅलिली यांना ल्यूट नावाचे तंतूवाद्य वाजवता येत असे. हा माणूस संगीतावर मनापासून प्रेम करणारा होता. गॉलिलिओची आई ज्युलिया अम्मानाती हिला मात्र विन्चॅन्सोच्या संगीतप्रेमाविषयी तिटकारा होता. पण, पत्नीच्या संगीतद्वेषाकडे दुर्लक्ष करीत विन्चॅन्सोने आपली संगीताची आवड जोपासली. गॅलिलिओ गॅलिली या पुस्तकात अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिहितात, ‘विन्चॅन्सोनं व्हेनिसमधल्या प्रसिद्ध संगीतकाराकडे संगीताचे धडे गिरवले होते. शिकत असतानाच त्याला पारंपरिक पद्धतीचं संगीत आवडेनासं झालं.
आपण संगीतामध्ये नवनवे प्रयोग करून एक क्रांती केली पाहिजे, असंही त्याला अनेकदा वाटे. …त्या काळाकडे बघता विन्चॅन्सो हा खूपच पुढारलेल्या विचारांचा, नवनव्या कल्पनांना साकारणारा, प्रस्थापितांशी झगडणारा आणि नवनवे प्रयोग करून बघणारा सर्जनशील विचारांचा माणूस होता.(पृष्ठ १९). आपल्या वडिलांपासून संगीतप्रेमाचा वारसा गॅलिलिओने स्वीकारला, त्याला ल्यूट हे तंतूवाद्य उत्तम वाजवता येत असे.
फ्लॉरेन्सजवळच्या व्हालोब्रास येथील एका मठात चार वर्षे राहून गॅलिलिओने पियानो, बासरी ही वाद्ये वाजवण्याचे कसब आत्मसात केले. गॅलिलिओ हा विद्रोही खगोलशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होता, त्याचे वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व होते. संगीतात नेमकेपणाला फार महत्त्व असते. सूर आणि ताल यांचे साहचर्य अचूक असले तरच संगीत प्रभावी आणि परिणामकारक ठरत असते. आपले बोलणे, लिहिणे, संशोधन अचूक असावे असा प्रयत्न करणाऱ्या गॅलिलिओने आयुष्यभर मनापासून संगीतकला जोपासली.
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि शांतता या प्रकाशतत्त्वांचा पुरस्कार करणारा नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनने मांडलेले E=MC² हे समीकरण, सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि अनेक नवे शोध व संशोधन या गोष्टींनी विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवले. अणुबॉम्बचा वापर करणाऱ्या अमेरिकेचा तीव्र निषेध केल्यानंतर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने आईनस्टाईनच्या विरोधात १८०० कागदपत्रे गोळा केली, त्याचे फोन टॅप केले; या काळात त्याला कडक निगराणीत रहावे लागले, त्याच्याविषयी वेगवेगळे संशय व्यक्त केले गेले, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या आईनस्टाईनला अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला काहीच करता आले नाही. जागतिक पातळीवर शांतता नांदावी युद्ध नको म्हणून प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्र आईनस्टाईनने भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लिहिले होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या जागतिक शांततेच्या जाहीरनाम्यावर आईनस्टाईनची स्वाक्षरी आहे. अल्बर्ट आईनस्टाईनला संगीत या कलेविषयी विलक्षण आकर्षण होते. टेबल-खुर्ची, कागद-लेखणी वगैरे लेखनसाहित्य, व्हॉयोलिन आणि अंथरूण या गोष्टी जवळ असणे आवश्यक आहे, बाकी भौतिक सुविधा नसल्या तरी चालेल असे मानणारा आईनस्टाईन तासनतास व्हॉयोलिन वाजवत असे.
”शास्त्रज्ञांनी हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम करण्याऐवजी लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असले पाहिजे” असे म्हणणाऱ्या आईनस्टाईनने लोककल्याणासाठी मौलिक संशोधन व लेखन केले. आईनस्टाईनची आई पॉलीन हिला संगीताची आवड होती, ती पियानो उत्तम वाजवीत असे. आई पॉलीनकडून आईनस्टाईनने संगीतप्रेमाचा वारसा स्वीकारला. वयाच्या सहाव्या वर्षापासून आईनस्टाईन व्हॉयोलिन वाजवत असे. ध्यासमग्न आईनस्टाईनला आयुष्यभर व्हायोलिनच्या सुरांची साथ होती. आईनस्टाईनला जगप्रसिद्ध संगीतकार वुल्फगॅंग अमॅडेअस मोत्झार्टचे संगीत मनापासून आवडत असे.
जगप्रसिद्ध लेखक बोरिस पास्तरनाक यांनी आपल्याच देशात मानहानी, छळ, द्वेष सारे काही सहन केले. १९५७ मध्ये त्यांच्या ‘डॉ. झिवॅगो’ या जगप्रसिद्ध कलाकृतीवर रशियातील सरकारने बंदी घातली. नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतरही रशियातील सत्ता आणि साहित्यिकांनी पास्तरनाक यांची प्रचंड मानहानी केली, त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास जर पास्तरनाक स्टाकहोम येथे गेले तर त्यांना पुन्हा रशियात प्रवेश दिला जाणार नाही असेही कळवण्यात आले. एखाद्या गुन्हेगाराविषयी समाजाला वाटावा तसा तिरस्कार पास्तरनाक यांच्याविषयी निर्माण केला गेला. नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरही पास्तरनाक यांची मानहानी सुरूच होती.
रशियातील राजकीय सत्तेसह साहित्यिकांनी पास्तरनाक यांचा प्रचंड दुस्वास केला, निर्भत्सना केली. हा छळ सहन करताना हा जगप्रसिद्ध साहित्यिक मनातून फार दु:खी झाला. बहिष्कार, द्वेष, आरोप, निर्भत्सना सहन करीत ३० मे १९६० रोजी पास्तरनाकचा कॅन्सरने मृत्यू झाला. राजकीय सत्तेने छळ केला, बहिष्कार टाकला, अवहेलना केली; नोबेल पारितोषिक स्वीकारू दिले नाही म्हणून पास्तरनाक यांची निर्भयता आणि लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.
डॉ. झिवॅगो या कादंबरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वास्तवाचे अंक जगातील वाचकांना मन:पूर्वक आवडले. हाच द्वेषमूलक क्रूर राजसत्तेचा खरा पराभव आहे. लेखक पास्तरनाक जिंकले; पास्तरनाक यांचे वडील लिएनेड पास्तरनाक प्रसिद्ध चित्रकार होते, तर आई रोझा काफमेन ही उत्तम पियानोवादक होती.
एकूण काय तर विद्रोहाची विचारशील अभिव्यक्ती करणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि बोरिस पास्तरनाक या तीनही प्रतिभावंतांचे संगीत या कलेशी नाते होते.
प्रा. डॉ. अजय देशपांडे
संपर्क : ९८५०५९३०३०
Read About : Gravitational Waves : अंतराळाची अदृश्य कंपने: गुरुत्वाकर्षण तरंग
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.