उल्हासनगरला पुन्हा नियोजनबद्ध शहराचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न
मुंबई : Land Ownership Rights – उल्हासनगरमध्ये स्थायिक झालेल्या सिंधी समाजातील बांधवांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देणे आणि जमिनी फ्रीहोल्ड करणे याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेची सुरुवात नागपूरपासून करण्यात आली असून लवकरच उल्हासनगरमध्येही ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण क्षेत्राकडे केवळ व्यवसाय किंवा पैसा कमावण्याचे साधन म्हणून न पाहता समाजनिर्मितीची व्यवस्था म्हणून पाहण्याची एचएसएनसी संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
सिंधी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान
देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाजातील अनेक कुटुंबांना आपली घरे, संपत्ती आणि सर्वस्व मागे सोडून भारतात यावे लागले. उल्हासनगर आणि मुंबईतील चेंबूरसह विविध ठिकाणी हा समाज स्थायिक झाला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही या समाजाने मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या जोरावर पुन्हा उभारी घेतली. आज देशातील उद्योग, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सनदी लेखा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सिंधी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ते म्हणाले.
उल्हासनगरच्या पायाभूत विकासाला गती देणार
उल्हासनगरच्या विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उल्हासनगरचा समावेश मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या व्यापक संकल्पनेत करण्यात आला आहे. शहरात मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून मेट्रोमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याशिवाय, काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना यासारख्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे सुरू होत आहेत.
अनधिकृत घरांचा प्रश्न
उल्हासनगरला पुन्हा नियोजनबद्ध शहराचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अनधिकृत ठरलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यासह क्लस्टर विकासाच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध व्यापक आराखडा तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Read About : Agricultural Research Projects in Marathwada- शेतकऱ्यांच्या बांधावर उतरणार नवे तंत्रज्ञान; बदलणार मराठवाड्याची शेती
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.