Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Wildlife Sanctuaries Management- मराठवाड्यातील अभयारण्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरसावले प्रशासन

वन्यजीव विभाग भारतीय वन्यजीव संस्थानच्या शिफारशींनुसार उपाययोजना करणार

छत्रपती संभाजीनगर Marathwada Wildlife Sanctuaries Management : जैवविविधतेने समृद्ध अशी मराठवाड्यात अभयारण्यांचे प्रशासनाकडून वरचेवर संवर्धन आणि व्यवस्थापन होत असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्ल्यूआयआय) व्यवस्थापन परिणामकता मूल्यांकन अहवालाने (मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हॅल्यूशन-एमईई) समोर आणले. ही बाब दै.पुण्यनगरीने उजेडात आणत वन्यजीव विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. याची दखल अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, बोरीवली यांनी घेत डब्ल्यूआयआयच्या शिफारशींनुसार तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मराठवाड्यात जायकवाडी पक्षी (पैठण, अहिल्यानगर), गौताळा औट्रम घाट (कन्नड, जळगाव), येडशी रामलिंग घाट (धाराशिव) आणि नायगाव मयुर (बीड) अशी ४ जैवविविधतेने समृद्ध अभयारण्ये आहेत. वाघ, बिबट, सायाळ, खवले मांजर, चौसिंगा, काळवीट, निलगायी, रानडुक्कर, ससे, ढोल यांसह विविध प्रकारचे साप, फुलपाखरे, देश-विदेशातील पाणपक्षी, भारतीय पक्षी, किटक, सरडे, घोरपडी, मासे आदी प्राणी-पक्ष्यांसह विविध प्रकारच्या वनस्पती-वेली आढळून येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्य देशीतील महत्वाचे पाणथळ असून देश-विदेशातील स्थलांतरित पक्षी येथे हजोरोंच्या संख्येने आढळतात. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाणथळ म्हणून त्याची सरकारने नोंद घेतलेली असून रामसर दर्जासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. गौताळा औट्रम घाट अभयारण्यात विविध वन्यजीव आढळतात. तणमोर पक्ष्याची नोंद येथे झालेली आहे. भूंकणारे हरीण, ढोल, खवले मांजर, सायाळ, चौसींगा आदी वन्यजीव येथे आढळतात. गेल्या ५ वर्षांपासून येथे वाघ आलेला आहे.

येडशी रामलिंग घाट अभयारण्यातही विविध वन्यजीव आढळतात. हेरिटेज रेल्वे गेस्ट हाऊस या अभयारण्याची ओळख. येथेही गेल्या २ वर्षांपासून वाघ आलेला आहे. राष्ट्रीय पक्षी मोर ही नायगाव मयुर अभयारण्याची खास ओळख. असे असले तरी विविध पक्षी-प्राणी येथे आढळतात. धाराशिवच्या वाघाचा या परिसरातही वावर आहे. असे असताना या अभयारण्यांचे व्यवस्थापन विभागीय वन्यजीव अधिकारी कार्यालयाकडून वरचेवर सुरू होते. यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. शिवाय मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झालेली आहे. अभयारण्यालगतच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीच्या घटनांचा सामना करावा लागत आहे.

प्रस्ताव, कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना

भारतीय वन्यजीव संस्थानने याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवत संबंधित अभयारण्यांसाठी आवश्यक शिफारशी केलेल्या आहेत. याबाबत पुण्यनगरीने विशेष वृत्त प्रसिद्ध करत यंत्रणेच्या डोळ्यांत जळजळीत अंजन भरले होते. याची दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने या शिफारशींच्या अनुशंगाने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत पाऊल उचलले आहे. संबंधित वन्यजीव अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव आणि कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

डब्ल्यूआयआयच्या अहवालातील शिफारशींनुसार तत्काळ उपाययोजना केल्या जातील. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेले आहेत. प्रस्ताव मागविला आहे. कृती कार्यक्रम आखून उपायोजना राबविल्या जातील. अभयारण्यांचे संवर्धन, वन्यजीवांची सुरक्षा यासाठी वन्यजीव विभाग तत्पर आहे.
– डॉ. रविकिरण गोवेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, महाराष्ट्र शासन

अहवालातील शिफारसी अशा

जायकवाडी पक्षी वन्यजीव अभयारण्य (पैठण, अहिल्यानगर)

हक्क निश्चितीची प्रक्रिया प्रदीर्घ असल्याने, या संरक्षित क्षेत्रावर आसपासच्या समुदायांकडून संसाधनांच्या वापराचा मोठा दबाव कायम आहे. २,००० हून अधिक व्यक्ती बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचे दिसून येते. पर्यटकांना आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत. कर्मचारी आणि निधीची तीव्र कमतरता असल्याने व्यवस्थापनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात अडचणी येतात. योग्य ठिकाणांपैकी सुमारे १० टक्के भाग ‘संरक्षण क्षेत्र’ (प्रोटेक्टेड एरिया) म्हणून घोषित करावा. संरक्षण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. हिवाळ्यात बेटांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवल्या पाहिजेत; प्रभावी व्यवस्थापनासाठी निधीची उपलब्धता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गौताळा औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य

काळवीटांचे अस्तित्व असलेल्या विरग गवताळ भागासाठी एक पद्धतशीर व्यवस्थापन योजना तयार करून तिची अंमलबजावणी करणे; तण काढण्यासाठी एक पद्धतशीर प्रकल्प सुरू करणे. संरक्षित क्षेत्राच्या सीमेवरील रस्ते प्राण्यांच्या येण्या-जाण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री करणे. आवश्यक तिथे फळझाडे लावणे. पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रासाठी क्षेत्रीय योजना तयार करणे आणि शेजारील वनक्षेत्रांचा संरक्षित क्षेत्रात समावेश करण्याबाबत विचार करणे. वाढत्या पर्यटकांच्या संख्येनुसार त्यांच्यासाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे. तसेच, या संरक्षित क्षेत्रात स्थानिक खूर असलेल्या प्राण्यांना पुन्हा प्रस्थापित करण्याची योजना आखणे.

नायगाव मयुर वन्यजीव अभयारण्य, बीड

परिसरातील सहा गावे आणि दोन वाड्यांमधील पशुधनाद्वारे होणारा अति-चरण्याचा दबाव आणि लाकूडतोडीमुळे या क्षेत्रावर मोठा ताण निर्माण होतो. याशिवाय, अभयारण्याच्या हद्दीत खाजगी जमिनींचे अस्तित्व, जवळून जाणारे वर्दळीचे महामार्ग, जनावरांना खाण्यायोग्य नसलेले गवत व तणांची वाढ, उन्हाळ्यातील पाणीटंचाई, तसेच वनक्षेत्रपालांच्या निवासाची आणि माहिती केंद्राची अनुपलब्धता यांसारख्या आव्हानांचा या क्षेत्राला सामना करावा लागतो. नवीन व्यवस्थापन योजना तयार करणे, सीमास्तर आणि जनावरे आत येऊ नयेत यासाठी कुंपण बांधणे, परिणाम कमी करण्यासाठी पर्यटनाचे नियमन करणे. संरक्षित क्षेत्राचे योग्य विभागीय विभाजन करणे. माहिती केंद्राचा विकास करणे, नायगाव येथे प्रवेशद्वार उभारणे आणि कर्मचारी प्रशिक्षण व पर्यावरणीय देखरेख प्रयत्नांना चालना देणे आवश्यक.

येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य, धाराशिव

गुरे चराई, रामलिंग मंदिराकडे येणाऱ्या भाविकांची गर्दी आणि राज्य महामार्गावरून वाढलेली वाहनांची वर्द यांमुळे वन्यजीवांच्या अधिवासात व्यत्यय निर्माण होतो. इको-डेव्हलपमेंट (पर्यावरण-विकास) कार्यक्रम निष्क्रिय असणे, आक्रमक तणांचा प्रादुर्भाव आणि वणवे लागण्याच्या घटना, माहिती केंद्राचे अकार्यक्षम असणे आणि कर्मचारी वर्गाला वन्यजीव व्यवस्थापनाचे पुरेसे प्रशिक्षण नसणे ही काही प्रमुख आव्हाने आहेत. या समस्यांचे निराकरण करणे या संरक्षित क्षेत्राच्या भविष्यातील शाश्वततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य क्षेत्रविभागणीसह नवीन व्यवस्थापन योजनेची तयारी करणे, कर्मचाऱ्यांसाठी योग्य उपकरणे आणि नियमित वन्यजीव प्रशिक्षण, अधिक कॅमेरा ट्रॅप बसवणे आणि प्रमुख प्रजातींचे पद्धतशीर निरीक्षण करणे, वन्यजीवांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता सुधारणे गरजेचे.

Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.