मंगरूळ फाट्याजवळ भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी
करमाड Illegal Sand Transport Accident Karmad : सुखना नदीतून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाड-पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ रविवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. अभिषेक पुनमचंद बिमरोट (२६) आणि अर्जुन काळुसिंग बिमरोट (२०, दोघे रा. नागुनीची वाडी) अशी मृत तरुणांची नावे असून, प्रकाश कांतिलाल बिमरोट (३०) हा गंभीर जखमी झाला आहे. तिघेही चुलत भाऊ असल्याने या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
अभिषेक, अर्जुन आणि प्रकाश हे तिघे चुलत भाऊ रविवारी दुचाकीने (एमएच २० एचएल ०९७६) नागुनीची वाडी येथून कुंकू-टिळ्याच्या कार्यक्रमासाठी जोडवाडीकडे निघाले होते. करमाड-पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ समोरून येणाऱ्या रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाने (एमएच २०-९३७४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही दूर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अभिषेकला मृत घोषित केले. उपचार सुरू असताना अर्जुनचाही मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रकाश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत नांदवे, संजय सपकाळ आणि अतुल गीते पुढील तपास करीत आहेत.
दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
या अपघातात मृत झालेले अभिषेक आणि अर्जुन हे दोघेही आई-वडिलांचे एकुलते एक मुलगे होते. अभिषेकच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी, तर अर्जुनच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. एकाच गावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागुनीची वाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोघांवरही उशिरा रात्री गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.