Ad Advertisement Ad Advertisement

Mohammad Mazeen Fraud Case – महिलांचे शोषण करणाऱ्या माझीनला दुबईत पाकिस्तानीचा गंडा

एटीएसही करणार चौकशी : एकाच वेळी अनेकींना फिरविल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती

छत्रपती संभाजीनगर : Mohammad Mazeen Fraud Case लग्नाचे आमिष दाखवून १४ हून अधिक तरुणींचे लैंगिक व आर्थिक शोषण करणाऱ्या मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद (३३, रा. काजीवाडा, भडकल गेट) याच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून धक्कादायक तपशील समोर आले आहेत. शहरात तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालून दुबईत पसार झालेल्या या भामट्याची तेथे एका पाकिस्तानी तरुणाने आर्थिक फसवणूक केली आहे. या पाक कनेक्शनमुळे आणि परदेशातील आर्थिक व्यवहारांमुळे आता या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) त्याची चौकशी करणार असून तो एकाचवेळी अनेक तरुणींना फिरवित असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

शहर पोलिसांनी सीबीआय व इंटरपोलच्या मदतीने दुबईतून प्रत्यर्पण करून आणलेला माझीन सध्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आह. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शहरात अनेक तरुणी आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर भंडाफोड होण्याच्या भीतीने माझीन दुबईत पळून गेला होता. तेथे वास्तव्यास असताना त्याची एका पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाली. मात्र, इतरांना प्रेमाच्या व पैशांच्या जाळ्यात अडकविणाऱ्या माझीनलाच त्या पाकिस्तानी तरुणाने गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्याचे वर्षभराचे दुबईतील वास्तव्य, पाकिस्तानी तरुणाशी संपर्क, परदेशातील संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि शोषण झालेल्या तरुणींची मोठी संख्या हे मुद्दे तपास यंत्रणांनी गांभीर्याने घेतले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करीत आहेत.

पोलीस करणार बँकांशी पत्रव्यवहार

आरोपी माझीनने अनेक महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करून त्यांच्याकडून सुमारे ४९ लाख रुपये उकळले आहेत. यातील अनेक व्यवहार हे ऑनलाइन झालेले आहेत. त्यामुळे पोलीस बँकांशी पत्रव्यवहार करून सर्व व्यवहार उघड करणार आहेत. तसेच, त्याने मोबाइलमधील सर्व डेटा उडविलेला असल्याने सायबर पोलिसांच्या मदतीनेतो डेटा रिकव्हर करण्याचीही प्रक्रिया पोलीस करीत आहेत. त्याने दुबईसोबतच पाकिस्तान व इतर देशात प्रवास केला आहे का? याची माहितीही पोलीस घेणार आहेत.

औरंगपुऱ्यातील हॉटेलचालक अडचणीत

माझीन एकाच वेळी अनेक तरुणींना एकमेकींना जराही सुगावा लागू न देता फिरवत होता. यासाठी त्याने औरंगपुरा परिसरातील दोन हॉटेल्समध्ये उधारीचे खाते सुरू केले होते. या दोन्ही हॉटेल्समध्ये त्याचे सतत येणे-जाणे असल्याने त्याला कोणतेही ओळखपत्र न तपासताच थेट रूममध्ये प्रवेश दिला जात होता. नियम धाब्यावर बसवून रूम देणारी ही दोन्ही हॉटेल्स आता पोलिसांच्या रडारवर आली आहेत. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख करीत आहेत.

Read About: Women Exploitation Accused Brought from Dubai – महिलांचे लैंगिक, आर्थिक शोषण करून विदेशात पळालेल्या आरोपीला दुबईतून भारतात आणले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.