Advertisement Advertisement

European Roller spotted at Janjala Fort जंजाळा किल्ल्यावर आढळला दुर्मिळ ‘युरोपीयन रोलर’ 2026

European Roller spotted at Janjala Fort: सिल्लोड जवळील ऐतिहासिक जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी परिसरात दुर्मिळ आणि अत्यंत आकर्षक अशा ‘युरोपीयन रोलर’ (नीलपंख) पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. निसर्ग मित्र मंडळ आयोजित निसर्ग भ्रमंती आणि पक्षी निरीक्षण कार्यक्रमा दरम्यान पक्षीमित्र किशोर गठडी यांना या विदेशी पाहुण्याचे दर्शन घडले. त्यांनी या पक्ष्यासह एकूण ३४ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद आंतरराष्ट्रीय ई-बर्डस् प्लॅटफॉर्मवर केली आहे.

या निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षण मोहिमेत परिसरातील नागरिकांसह रवींद्र देशपांडे, सौरभ पाठक, वर्षा कांडलिकर, सुनीता एरनाळे, संजय खर्चे, सविता खर्चे, शिवाजी गायकवाड, राजेश दैठणकर आणि सुभाष लाखोले आदी सहभागी झाले होते. पक्षी निरीक्षणादरम्यान एकाच वेळी २ युरोपीयन रोलर (Coracias garrulus) आणि ५ भारतीय रोलर पक्षी आढळून आले. युरोपीयन रोलर हा पक्षी त्याच्या अंगावरील गडद आणि फिकट निळ्या चमकदार रंगांमुळे ओळखला जातो. हवेमध्ये सूर मारत, कसरती करत उडण्याच्या वैशिष्ट्यामुळे याला रोलर हे नाव पडले आहे. जंजाळा किल्ल्याच्या तटबंदीवरून आणि हिरव्यागार दरीच्या पार्श्वभूमीवर या पक्ष्याचे उडतानाचे विहंगम दृश्य गठडी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

हजारो किलोमीटरचा प्रवास

(Coracias garrulus युरोपीयन रोलर हा पक्षी भारतात कायमस्वरूपी वास्तव्य करत नाही, तर तो एक प्रवासी पक्षी आहे. मध्य आशिया आणि काश्मीरच्या भागात वीण झाल्यानंतर, हिवाळा घालवण्यासाठी हे पक्षी थेट दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करतात. या हजारो किलोमीटरच्या प्रवासादरम्यान, ऑगस्ट ते नोव्हेंबर या शरद ऋतूच्या काळात ते भारतात विश्रांतीसाठी काही काळापुरते थांबतात.

३४ प्रजातींचे पक्षीवैभव

या निसर्गभ्रमंती दरम्यान गठडी यांनी नोंदवलेल्या ३४ प्रजातींमध्य खाटीक, चंडोल, सुतार पक्षी, कोकिळा, पांढऱ्या छातीचा खंड्या, टिटवी, सुगरण, ठिपकेवाली मुनिया, चांदीमुनिया, पाकोळ्या, पिंगळा, बुलबुल , कोतवाल आदी पक्ष्यांचा समावेश आहे.