ओक वृक्षांना भरपूर फळे आल्यानंतर उंदरांची संख्या वाढते आणि पुढील काळात रोग पसरवणाऱ्या गोचिडांचा धोका वाढतो
न्यूयॉर्क : Lyme Disease Risk अमेरिकेसह युरोप आणि आशियातील अनेक भागांत पसरणाऱ्या लाइम आजाराचा धोका कोणत्या वर्षी अधिक असेल, याचा अचूक अंदाज आता जंगलातील उंदीर आणि ओक वृक्षांच्या फळांच्या संख्येवरून लावता येणार आहे. न्यूयॉर्कमधील कॅरी इन्स्टट्यिूट ऑफ इकोसिस्टम स्टडीजच्या शास्त्रज्ञांनी तब्बल ३५ वर्षे केलेल्या संशोधनातून हा अनोखा उलगडा झाला आहे.
हरणांचा नव्हे, तर उंदरांचा थेट संबंध
लाइम हा आजार बोरेलिया बर्गडॉर्फेरी या जिवाणूने बाधित ब्लॅक-लेग्ड टिक्स (गोचीड किंवा कीटक) चावल्यामुळे होतो. आजवर असा समज होता की, जंगलात पांढऱ्या शेपटीच्या हरणांची संख्या वाढली की गोचिडांची संख्या वाढते आणि आजार पसरतो. मात्र, ३५ वर्षांच्या डेटाच्या विश्लेषणातून हरणांची संख्या आणि रोग पसरवणाऱ्या लहान गोचिडांची संख्या यांचा जवळपास काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. याउलट, जंगलातील पांढऱ्या पायांच्या उंदरांची संख्या वाढल्यास, पुढील वर्षी गोचिडांच्या संख्येत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले.
ओक झाडांची फळे आणि दोन वर्षांचे चक्र
उंदीर हे लाइम जिवाणूंचे मुख्य वाहक असतात; त्यांच्या अंगावर जगणारे गोचीड या जिवाणूने बाधित होतात. संशोधकांना आढळले की, ज्या वर्षी ओक झाडांना फळे भरपूर प्रमाणात येतात, त्या वर्षी उंदीर, खारी आणि इतर लहान प्राण्यांना मुबलक अन्न मिळाल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते. परिणामी, त्यापुढील दुसऱ्या वर्षी रोग पसरवणाऱ्या गोचिडांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते.
मुख्य संशोधक रिचर्ड ऑस्टफेल्ड आणि शॅनन लाडू यांच्या मते, तापमानवाढीमुळे गोचिडांचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा होती, परंतु प्रचंड उष्णतेमुळे पुढील वर्षी गोचिडांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.