Ad Advertisement Ad Advertisement

UPI Payments and Spending Habits : यूपीआयने पैसे देणे खरेच सोपे झाले का?

UPI Payments and Spending Habits : ‘या महिन्यात मी कुठलीही मोठी खरेदी केली नाही तरी पैसे गेले कुठे?’ महिनाअखेरीस हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? घरभाडे, किराणा, मुलांची फी आणि कर्जाचे हप्ते यांचा हिशेब आठवतो, पण चहाच्या टपरीपासून ऑनलाईन केलेल्या छोट्या व्यवहारांची बेरीज लक्षात येत नाही. प्रत्येक वेळी मोबाईल काढला, कोड स्कॅन केला आणि पैसे दिले, व्यवहार संपला; पण खर्चाचा विचार तिथेच आपण करत नाही!

समजा, पुण्यात नोकरी करणाऱ्या अमोलचा पगार ६०,००० आहे. त्याला वाटते, ‘मी उधळपट्टी करत नाही, महागडे कपडे घेत नाही, हॉटेलमध्येही फार जात नाही.’ एका रविवारी त्याने बँक खात्यातील व्यवहार तपासले. चहा, नाश्ता, बाहेरचे खाणे आणि सहज केलेल्या खरेदीवर बरीच रक्कम गेली होती. प्रत्येक व्यवहार हा छोटी रक्कम होता; महिन्याची बेरीज मात्र मोठी होती.

यूपीआयने व्यवहार सोपे केले आहेत. सुट्या पैशांची अडचण कमी झाली, पैसे पाठवणे सुलभ झाले आणि व्यवहारांची नोंदही उपलब्ध झाली. पण, पैसे देण्याची सोय आणि पैसे सांभाळण्याची शिस्त या दोन्ही गोष्टी आपोआप एकत्र येत नाहीत.

पैसे जातात; जाणीव किती होते? खिशातून ५०० ची नोट काढताना ती हातातून जाताना दिसते. उरलेले पैसे मोजताना खर्चाची पुन्हा जाणीव होते. डिजिटल व्यवहारात ही जाणीव कमी तीव्रतेने होते. मानसशास्त्रात याला ‘पैसे खर्च केल्याची वेदना’ म्हणजेच ‘पेन ऑफ पेइंग’ म्हणतात. वस्तू मिळाल्याचा आनंद पुढे येतो आणि त्यासाठी मोजलेल्या किमतीचा विचार मागे पडतो.

२०२४ मध्ये ‘जर्नल ऑफ रिटेलिंग’मध्ये प्रकाशित झालेल्या ७१ संशोधनलेखांच्या एकत्रित विश्लेषणात रोखविरहित व्यवहारांमुळे खर्चात सरासरीने लहान, पण लक्षणीय वाढ आढळली. अर्थात, हा निष्कर्ष केवळ यूपीआयपुरता नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा खर्च वाढतोच असेही नाही. मात्र, आपल्या खर्चाच्या सवयी तपासण्याचे हे एक ठोस कारण नक्कीच आहे. पूर्वी खिशातले पैसे संपले की खरेदी पुढे ढकलली जायची. आता मोबाईल जवळ असेल तर खात्यातील रक्कम सहज वापरता येते, त्यामुळे ‘आज पुरे’ ही मर्यादा आपल्यालाच ठरवावी लागते.

‘फक्त १०० रुपये’ म्हणता म्हणता… समजा, गरजेपलीकडे दररोज सरासरी १०० रुपये खर्च होतात. महिन्याला सुमारे ३,००० आणि वर्षाला ३६,५००! याचा अर्थ चहा पिऊ नका किंवा आनंदावर खर्च करू नका असा अजिबात नाही. प्रश्न एवढाच आहे की, हा खर्च तुम्ही ठरवून करत आहात की सवयीने? १०० च्या व्यवहाराची परवानगी देताना वर्षाच्या ३६,५०० च्या खर्चालाही तुम्ही नकळत परवानगी देत असता. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हे सूत्र जसे बचतीला लागू होते, तसेच ते लहान खर्चांच्या बाबतीतही खरे ठरते.

ऑफरमुळे बचत की जास्त खरेदी? ‘३०० रुपये खर्च करा आणि २० कॅशबॅक मिळवा,’ अशी ऑफर दिसली की आधी खरेदीची गरज तपासा. गरज नसताना केलेल्या ३०० रुपयांच्या खरेदीवर २० परत मिळाले, तरी २८० खर्च झालेच. सवलत मिळाल्याचा आनंद आणि पैसे वाचल्याचे समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

नोंद आहे; पण आढावा आहे का?

यूपीआय व्यवहारांचा इतिहास उपलब्ध असतो, त्यामुळे खर्च शोधणे उलट सोपे होऊ शकते. पण, मोबाईलवर आलेले पैसे वजा झाल्याचा संदेश वाचणे म्हणजे खर्चाचा आढावा घेणे नव्हे.

खर्चाचे भान ठेवण्यासाठी ५ सवयी

१. आठवड्याची मर्यादा ठरवा
चहा, नाश्ता, बाहेरचे खाणे आणि हौसेच्या खरेदीसाठी स्वतंत्र बजेट ठेवा. महिन्याचे ४,००० ठरवले असतील, तर दर आठवड्याला साधारण १,००० ची मर्यादा लक्षात ठेवा.

२. रोजची बेरीज पाहा
रात्री २ मिनिटे काढून दिवसभरात किती खर्च झाला ते लिहा. प्रत्येक व्यवहाराची रक्कम लहान असली, तरी दिवसाची बेरीज तुमचे खरे चित्र दाखवते.
३. रविवारी १० मिनिटांचा आढावा घ्या
सर्व बँक खात्यांतील आणि वापरत असलेल्या ॲपमधील व्यवहार तपासा. स्वत:च्या खात्यांमधील पैसे हस्तांतरित करणे खर्चात मोजू नका. आवश्यक खर्च आणि टाळता आलेले खर्च वेगळे लिहा. पुढील आठवड्यात नेमके काय बदलायचे ते ठरवा.

४. खरेदीपूर्वी थोडे थांबा
नियोजनाबाहेरची, तातडीची नसलेली वस्तू दिसली तर लगेच पैसे देऊ नका. स्वत:ला विचारा, ‘ही गरज आहे की आत्ताचा मोह? यासाठी माझ्या बजेटमध्ये जागा आहे का?’ शक्य असेल तर निर्णय दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे ढकला. अनेकदा खरेदीची उर्मी ओसरते.

५. बचत आधी बाजूला काढा
पगार आल्यावर ठरवलेली बचत आणि आगामी आवश्यक देयकांची तरतूद करा. त्यानंतर उरलेल्या रकमेत दैनंदिन खर्च बसवा. महिनाअखेरीस उरेल तेवढी बचत करण्याच्या सवयीमुळे बचतीचा क्रमांक नेहमी शेवटी लागतो. खर्चासाठी उपलब्ध रक्कम आधी स्पष्ट असणे गरजेचे आहे.

कृती : पुढील १५ दिवस प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा. पैसे कोणत्या पद्धतीने दिले यासोबत ते कशासाठी दिले हेही लिहा. पंधरवड्यानंतर बेरीज पाहा. अमोलने हाच प्रयोग केला आणि लक्षात आले की, कोणतीही मोठी काटछाट न करता केवळ विनाकारण होणारे छोटे व्यवहार थांबवून तो दरमहा ३,५०० सहज वाचवू शकतो. तुम्हालाही असेच काही खर्च दिसतील, ज्याबद्दल ‘हे टाळता आले असते’ असे जाणवेल; तिथूनच खरा बदल सुरू होईल.

पैसे देताना स्क्रीनवर दिसणारे ‘पेमेंट सक्सेसफुल’ हे व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगते. तो खर्च योग्य होता का हे तुमच्या आर्थिक नियोजनातून ठरते. यूपीआय वापरा, त्याची सोयही अनुभवा; प्रत्येक व्यवहारासोबत खर्चाचे भान मात्र जागे ठेवा. कारण पैसे देण्यासाठी काही सेकंद पुरतात; ते कमवण्यासाठी लागलेला वेळ आणि मेहनत यांची किंमत विसरू नका!

अभिजीत कोळपकर
संपर्क : ९५०३०८२७७८

Read About : Women Investors in India – गृहलक्ष्मीची सोनपावलं…
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.