Ad Advertisement Ad Advertisement

Prehistoric Fossil Discovery Map : शास्त्रज्ञांनी तयार केला ‘जीवाश्मांचा खजिना नकाशा’; 54 कोटी वर्षांचा इतिहास उलगडण्याची संधी!

५४ कोटी वर्षांच्या सागरी जीवाश्म नोंदींचा अभ्यास; कमी संशोधन झालेल्या प्रदेशांत उत्खनन आणि संग्रहालयांतील जुन्या नमुन्यांच्या पुनर्तपासणीला मिळणार दिशा

नवी दिल्ली : Prehistoric Fossil Discovery Map पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अनेक जीवांची माहिती आजही विज्ञानाला मिळालेली नाही. अशा अज्ञात प्रागैतिहासिक प्रजातींचे जीवाश्म कुठे सापडू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी संशोधकांनी जगाचा एक विशेष नकाशा तयार केला आहे. तब्बल ५४ कोटी वर्षांच्या सागरी जीवाश्म नोंदींच्या अभ्यासातून तयार झालेला हा नकाशा भविष्यातील उत्खनन आणि संशोधनाला नवी दिशा देऊ शकतो.

जर्मनीतील बवेरियन प्राकृतिक इतिसाहास राज्य संग्रहालयाचे थॉमस ए. न्यूबॉअर आणि व्हिएन्ना येथील प्राकृतिक इतिहास संग्रहालयाचे मॅथियास हार्झहॉजर यांनी हे संशोधन केले. यासाठी त्यांनी ‘पॅलिओबायोलॉजी डेटाबेस’मधील जगभरातील जीवाश्म नोंदींचा अभ्यास केला. उथळ समुद्रांमध्ये राहणाऱ्या प्राचीन प्राण्यांच्या अवशेषांचा भौगोलिक प्रसार तपासून, जीवाश्म सापडलेली ठिकाणे आणि अजूनही संशोधनाची गरज असलेले प्रदेश वेगळे करण्यात आले.

जुन्या खडकांपेक्षा नव्या थरांत संधी?

या अभ्यासातील महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे सर्वांत जुने खडकच नव्या जीवाश्मांच्या शोधासाठी सर्वोत्तम असतात, असे नाही. पॅलिओझोइक आणि मेसोझोइक काळातील अनेक सागरी खडकांचा यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. त्यामुळे सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सेनोजोइक कालखंडातील खडकांमध्ये अज्ञात जीवांचे पुरावे मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांना आढळले.

संग्रहालयांतील जीवाश्मांकडेही लक्ष

या नकाशामुळे कमी अभ्यास झालेल्या भागांमध्ये उत्खननाला प्राधान्य देता येईल. तसेच संग्रहालयांमध्ये अनेक वर्षांपासून जतन केलेले, पण अद्याप सविस्तर तपासले न गेलेले जीवाश्म पुन्हा अभ्यासता येतील.

शोधाची हमी नाही, पण दिशा निश्चित

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा इतिहास अद्याप अपूर्ण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा नकाशा नव्या प्रजाती सापडण्याची हमी देत नसला, तरी मर्यादित संशोधन साधनांचा अधिक नियोजनबद्ध वापर करण्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे डायनासोरच्या काळानंतरच्या जीवसृष्टीविषयीही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Read About : Nemesis Sun Twin Star Theory : डायनासोरच्या विनाशामागे सूर्याचा जुळा तारा? दर 2.6 कोटी वर्षांनी धूमकेतूंच्या वर्षावाचा सिद्धांत चर्चेत!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.