रामेश्वर पाटीजवळ भीषण अपघात; मृतांमध्ये लाख येथील युवकांचा समावेश, चालक वाहनासह पसार
औंढा नागनाथ Hingoli road accident : तालुक्यातील रामेश्वर पाटीजवळ रविवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात लाख येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. जिंतूरकडून औंढा नागनाथमार्गे लाखकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या दुर्घटनेमुळे लाख गावावर शोककळा पसरली आहे.
भगवान कुंडलिक काळे (वय ४०) आणि महेंद्र रंगराव तळणकर (वय ३०, दोघेही रा. लाख) अशी अपघातात प्राण गमावलेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघे एमएच ३८ वाय ६७६१ क्रमांकाच्या दुचाकीवरून जिंतूरकडून औंढा नागनाथमार्गे आपल्या लाख गावाकडे जात होते. सायंकाळी सहाच्या सुमारास रामेश्वर पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून, संबंधित वाहन व चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, कर्मचारी रविकांत हरकळ, किशोर पारिस्कर, तसेच महामार्ग पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खयामोद्दिन खतीब, राजाराम कदम व पोलीस कॉन्स्टेबल आडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मृत्यू झालेल्यांपैकी भगवान काळे हे अविवाहित होते, तर महेंद्र तळणकर हे विवाहित होते. एकाच गावातील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, विशेषत: महेंद्र तळणकर यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. फरार वाहनचालकाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
बरडशेवाळा : आदिवासी वस्तीतील पांगरी (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील अल्पभुधारक शेतकरी ग्यानोबा सिताराम टारफे (वय ५२) हे सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती तसेच गेल्या वर्षी पार पडलेला मुलीचा विवाह आदी घटनांमुळे आर्थिक विवचंनेत होते. त्या मानसिक त्रासातून त्यांनी सोमवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी विष प्राशन करुन आत्महत्या केली. घटनेनंतर हदगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. या बाबत मनाठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनाठा पोलीस तपास करत आहेत. शेतकरी टारफे यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता त्यांच्या मूळ गावी पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read About : Henry Nicholls Century Against India- न्यूझीलंडची 5 गडी गमावून 243 धावांपर्यंत मजल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.