Welfare Scheme Fraud : एखादा शारीरिक आजार झाला तर औषधोपचारांनी तो बरा करता येतो किंवा आटोक्यात ठेवता येतो. पण, जेव्हा एखादा आजार मानसिकतेलाच विळखा घालतो आणि त्याचा फैलाव होऊन तो सामाजिक मानसिकतेचा आजार होऊ पाहतो, तेव्हा मात्र त्याला सहजासहजी आवर घालता येत नाही. सध्या सामाजिक मानसिकतेला अशा काही आजारांचा विळखा पडला आहे. अन्यथा, व्यक्तीच्या स्वभावात आढळणारी स्वार्थाची प्रवृत्ती समाजात फोफावली नसती आणि त्यामुळे होणाऱ्या अन्यायाचे चटके अन्य कोणास सोसावे लागले नसते. गरज नसताना किंवा पात्रता नसतानाही जे काही फुकटात मिळेल ते पटकावून आपल्या पदरात कसे पडेल ते पाहण्याचा एक विकार समाजात फोफावला आहे. त्याचे अनेक पुरावेदेखील वेळोवेळी समोर आले आहेत आणि अशी फुकटेगिरी करणाऱ्या ‘उचल्यां’ना योग्य त्या कानपिचक्यादेखील मिळालेल्या आहेत. पण, या आजारामुळे मानसिकता निर्ढावल्यागत निबर होत असावी. तसे नसते तर उचलेगिरीचे आणि अनाठायी फायदे उपटण्याचे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्य प्रकरणांत त्यांची पुनरावृत्ती झाली नसती.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनत अशा फुकट्यांचा सुळसुळाट झाल्याचे प्रकरण अलीकडेच उजेडात आले होते. काही फुकट्यांनी या योजनेच्या निकषांची पायमल्ली करून योजनेचे लाभ पदरात पाडून घेण्याकरिता आपली प्रतिष्ठादेखील गुंडाळून खुंटीला टांगली हेदेखील स्पष्ट झाले होते. तरीही उचलेगिरीची संधी दिसेल तेथे साधण्याच्या सामाजिक आजाराला आपल्यापासून दूर ठेवण्यास सहसा कोणाची तयारी नसावी. अन्यथा, गरिबांना मोफत अन्न पुरविण्याच्या ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’वरही फुकट्यांनी डल्ला मारला नसता. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार, या योजनेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या देशभरातील सुमारे १३ टक्के लाभार्थींनी या योजनेतही घुसखोरी केली असून फुकटेगिरीच्या मानसिक आजाराचे दर्शन घडविल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन किंवा अधिक खोल्या असलेले घर, मोटारगाडी, वातानुकूलन यंत्रे किंवा शासकीय नोकरीत असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे योजनेच्या पात्रतेचे स्पष्ट निकष आहेत. तरीही देशभरातील ३६ राज्यांमधील अनेक कुटुंबांनी ते निकष धाब्यावर बसवून या योजनेत घुसखोरी केल्याचे अन्न व सार्वजनिक वितरण खात्याने केलेल्या एका नमुना पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
समाजातील सर्वात दुर्बल, गरजू आणि वंचित घटकांना आधार देणे हा कल्याणकारी योजनांचा मूळ आत्मा असतो. दारिद्र्य, असुरक्षितता आणि आर्थिक विषमतेशी झुंज देणाऱ्या कुटुंबांना हात देण्यासाठी राज्याने संसाधने उभी केलेली असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत समाजात ‘उचलेगिरी’ आणि ‘मिळेल तिथून ओरबाडण्याची’ प्रवृत्ती निर्लज्जपणे वाढताना दिसत आहे. आपण या मदतीसाठी खरोखर पात्र आहोत का, हा प्राथमिक नैतिक प्रश्न स्वत:ला न विचारता, केवळ हात धुवून ओरबाडण्याच्या मानसिकतेतून या योजनांवर तुटून पडणे हा एक गंभीर सामाजिक, मानसिक आजार बनला आहे. ही केवळ लालसेची बाब नाही, तर ज्यांच्यासाठी या योजना आहेत, त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा थेट अन्याय आहे. अशा योजनांचे लाभ खरोखरीच पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाच मिळतात का हे पाहण्यासाठी केल्या गेलेल्या पडताळणी मोहिमा आणि तपासण्यांमधून समोर आलेले हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेत निकषात न बसणारे, सरकारी सेवेतील किंवा इतर अपात्र घटक लाभार्थी ठरल्याचे प्रकार समोर आले. मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ योजनेतही उत्पन्न मर्यादा व इतर अटींचे उल्लंघन करणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करून नावे वगळण्याची वेळ आली. आता तर पंतप्रधान अन्नसुरक्षा योजनेतही सुमारे १३.२ टक्के ‘समावेश त्रुटी’ आढळून आल्याचे मूल्यांकन अभ्यासांतून स्पष्ट झाल्याने, या मानसिकतेवर तातडीने सामाजिक उपाययोजना करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.
पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे दिसते, तेव्हा हा गैरफायदा केवळ प्रशासकीय त्रुटीपुरता मर्यादित राहत नाही. यामागे ‘स्वार्थाचा बाजार’ फोफावलेला स्पष्ट दिसतो. सरकारी तिजोरीवर जमेल तसा हात मारावा, ही बेशिस्त आणि बेफिकीर वृत्ती समाजात बळावत चालली आहे; त्यामुळे गरज नसलेले, साधनसंपन्न आणि चलाख लोक लाभ पदरात पाडून घेतात, तर खऱ्या गरजू आणि प्रामाणिक घटकांना अनेकदा पायपीट करावी लागते. योजनांचा वेग वाढवण्याच्या नादात पडताळणी ढिली राहिली किंवा निकषांबाबत स्पष्टता कमी राहिली की या उचलेगिरीला रान मोकळे मिळते आणि त्याचा घातक परिणाम पात्र लाभार्थ्यांवर होतो.
या आजाराला आळा घालायचा असेल, तो मुळापासून उपटून काढायचा असेल तर कठोर पावले उचलावी लागतील. कठोर प्रशासकीय शिस्त आणि समाजाचे आत्मभान या दोन्ही गोष्टी एकाच वेळी, परखडपणे राबवाव्या लागतील. खोटी माहिती देऊन किंवा नियम दडवून लाभ उचलणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना धडा शिकवावा लागेल. ही प्रशासकीय कारवाईची एक बाजू आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांनीही प्रामाणिकपणाने आरशात पाहावयास हवे. आपण खरोखरीच या योजनेचे हक्कदार आहोत की इतरांचे हक्क हिरावून घेत आहोत, असा प्रश्न नागरिकांनी स्वत:लाच विचारावयास हवा. कल्याणकारी योजना या स्वार्थाची पोळी भाजण्याचे साधन नसून वंचितांच्या स्वाभिमानाचा आधार असतात. त्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर योजनांबद्दल संशयाचे वातावरण तयार होऊन खऱ्या वंचितांच्या हक्काकडेही संशयाने पाहण्याची वृत्ती वाढेल.
Read About : Maharashtra Police Recruitment Menstrual Leave : तरुणींच्या स्वप्नांना आधार!!
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीयसंपादकीय


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.