Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Police Recruitment Menstrual Leave : तरुणींच्या स्वप्नांना आधार!!

Maharashtra Police Recruitment Menstrual Leave : स्त्री-पुरुष समान असून मानव जातीचा प्रमुख घटक आहेत. हा विचार केला तर कोणताही भेदाभेद, विषमता जगात राहणार नाही. मात्र पुरुषसत्ताक प्रथा आणि परंपरांसमोर हा विचारच कालबाह्य ठरतो. काळ बदलतो मानवी व्यवहार आणि विचारांमध्ये मोठे परिवर्तन घडत असते. लोकांचे राज्य आले, लोकशाही आली. गुलामांचा व्यवहार, वेठबिगारी, मानवी तस्करी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. मात्र प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक कालखंडात स्त्रीला कायम दुय्यम स्थान देण्यात आले. घर, समाज असो की राजकारण स्त्रीबाबतचा मानवी दृष्टिकोन अपवाद वगळता बदलताना दिसत नाही. भाषण किंवा पुस्तकात स्त्रीला कितीही स्वातंत्र्य दिसत असले तरी जमिनीवरची परिस्थिती पुढच्या हजारो वर्षांत बदलणार की नाही, हा प्रश्नच आहे. जगातील अनेक राष्ट्रांसह भारतात लोकशाही व्यवस्था आहे. भारतीय राज्यघटनेने समतेचा अधिकार दिला आहे. परंतु सर्वाधिक अन्याय-अत्याचार स्त्रीवर्गावरच होतात. कोणी कितीही दाखले दिले तरी स्त्रीला मानव समजण्यास पुरुषी व्यवस्था नकार देते. ती केवळ उपभोगाची वस्तू आहे. हा समज कधीच कोणत्याही काळाला बदलविता येत नाही.

शरीरातील गर्भाशयामुळे स्त्री वर्गाची मासिक पाळी हार्माेनल चक्राशी संबंधित असते. मात्र याबाबत समाजाची भूमिका गैरसमजुती निर्माण करणारी आहे. तुम्ही निरक्षर असा की शिक्षित तिच्या शारीरिक बदलाबाबत अजूनही स्पष्ट बोलले जात नाही. परंपरांच्या नावावर मासिक पाळीही स्वातंत्र्यावर बंधने घालत असते. तरीही आपण स्त्री स्वातंत्र्याचा गजर करतो तेव्हा आपल्या मेंदूची भूमिका कोणती असते. जिथे विवेकी भूमिका नसते ती परंपरा युगानुयुगे सुरूच असते. महाराष्ट्रासारख्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध राज्यातही मासिक पाळीबाबत हीच अवस्था आहे. मोकळं बोलता येत नाही किंवा बोलले जात नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका दाम्पत्याने आपल्या मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचा आनंदोत्सव साजरा केला होता. त्या चांदगुडे कुटुंबाचे कौतुक झाले होते. मात्र ही भूमिका प्रत्येकाला का घेता येत नाही? वैद्यकशास्त्र किंवा विज्ञानाच्या अभावी अज्ञानतेचे बळी पडतो हे खरे आहे. मात्र आता राज्यात मासिक पाळीमुळे तरुणींची पोलीस भरतीची संधी हुकणार नाही!

महाराष्ट्र पोलिसांत समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या हजारो तरुणींसाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय नव्या आशेचा किरण ठरला आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास तरुणींना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारची याबाबत घोषणा केवळ प्रशासकीय सवलतीपुरती मर्यादित नाही, तर तरुणींचा सन्मान आणि भविष्याशी जोडलेली आहे. पहाटे उठून मैदानावर घाम गाळायचा, धावण्याचा सराव करायचा, गोळाफेक व लांब उडीचा सराव करायचा आणि नेमक्या चाचणीच्या दिवशीच मासिक पाळीमुळे मेहनत वाया जाण्याची असलेली टांगती तलवार आता राहणार नाही.

आजच्या सामाजिक परिस्थितीत तरुणींसाठी रोजगार हा केवळ अर्थार्जनाचा मार्ग नाही. तो आत्मनिर्भरता आणि सामाजिक प्रतिष्ठेचा पाया ठरलेला आहे. विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी मुलीची पोलीस भरतीतील निवड ही कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत परिवर्तन घडविणारी असते. परिस्थिती दारिद्र्याची असली तरी तरुणी स्वप्नांच्या जोरावर मैदानावर उतरतात. मात्र भरतीप्रक्रियेतील शारीरिक चाचणी ही वेळेच्या बंधनात अडकलेली असते. अशावेळी एखाद्या तरुणीला मासिक पाळी सुरू झाली की, तिचे मनोधैर्य खचून जात होते. मासिक पाळी ही कोणतीही कमजोरी किंवा आजार नाही. ती स्त्री शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु प्रत्येक तरुणीच्या शरीराची रचना आणि वेदना सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. मासिक पाळीदरम्यान शरीरात होणारे शारीरिक बदल धावण्याच्या वेगाला व सहनशक्तीला आव्हान देतात. अशावेळी वेदना सहन करीत मैदानावर उतरणे म्हणजे आरोग्य आणि संधीशी संघर्ष करण्यासारखे ठरते.

मासिक पाळीबाबत समाजात असलेले गैरसमज खरे तर नैसर्गिक प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. मात्र वैज्ञानिकताही अंगात भिनली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे आता मासिक पाळीच्या प्रश्नाला सार्वजनिक धोरणात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मुलींच्या कष्टावर अन्याय होऊ नये, ही भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी अडचण आल्यास वैद्यकीय तपासणीच्या माध्यमातून मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे तरुणींना पुरेशा विश्रांतीनंतर संपूर्ण क्षमतेने मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे. परंतु या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? पोलीस मैदानावरील आरोग्य तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, जलद किंवा मानसिक ताण येणार नाही, अशा पद्धतीने राबविली गेली पाहिजे.

वैद्यकीय प्रमाणपत्राचे निकष, मुदतवाढीच्या कालावधीतील चाचणीचे वेळापत्रक आणि संपूर्ण भरतीप्रक्रियेचा ताळमेळ, याबाबत नियमावली प्रसिद्ध झाल्यास संभ्रम टाळता येणार आहे. पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीदरम्यान मासिक पाळी आल्यास मुदतवाढ देणारा हा निर्णय स्त्री सक्षमीकरण आणि रोजगार संधीला समानता प्रदान करणारा आहे. ज्या तरुणींनी उद्याच्या स्वप्नांसाठी झोकून दिले आहे, त्यांच्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा निर्णय नक्कीच महाराष्ट्र विचाराला उजळणारा आहे. नैसर्गिक प्रक्रियेसमोर पराभव न स्वीकारता तरुणींच्या गुणवत्तेचा सन्मान करणारी ही व्यवस्था अधिक सक्षम व संवेदनशील बनली पाहिजे. सरकारच्या या निर्णयाचा देशाने स्वीकार केल्यास मुलींच्या मासिक पाळीबाबत असलेल्या अंधश्रद्घेचे संदर्भ बदलण्यास मदत मिळू शकेल!!

Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.