Ad Advertisement Ad Advertisement

Competitive Examinations – पेपरफुटीविरोधी कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा 2’रा अहवाल सादर

भरती आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न

मुंबई : Competitive Examinations – राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, 2024मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात आली आहे. गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

भरती आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने स्थापना केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे.

शिक्षा अधिक कठोर करण्याची शिफारस

गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

  • संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्था : सध्याच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये 5 ते 10 वर्षे कारावास, किमान 1 कोटी रुपये दंड आणि परीक्षा खर्चाची वसुली अशी तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून 7 ते 10 वर्षे कारावास, किमान 10 कोटी रुपये दंड, व्यापक नुकसानभरपाईची वसुली आणि मालमत्ता जप्तीची शिफारस केली आहे.
  • अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्ती : सध्या 3 ते 5 वर्षे कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने त्यात वाढ करून 5 ते 10 वर्षे कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित केला आहे.
  • गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्था : सध्याच्या कायद्यानुसार 1 कोटी रुपयांपर्यंत दंड, परीक्षेच्या प्रमाणशीर खर्चाची वसुली आणि चार वर्षांसाठी बंदी अशी तरतूद आहे. समितीने दंडाची मर्यादा 5 कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, परीक्षा खर्चाची वसुली करणे आणि संबंधित संस्थेला आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
  • सेवा पुरवठादार संस्थांचे संचालक आणि व्यवस्थापन : सेवा पुरवठादार संस्थेचे संचालक, व्यवस्थापनातील व्यक्ती किंवा संस्थेचा प्रभारी अधिकारी गैरप्रकारात सहभागी असल्यास त्यांच्यासाठी 5 ते 10 वर्षे कारावास आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. सध्या या गुन्ह्यासाठी 3 ते 10 वर्षे कारावास आणि 1 कोटी रुपये दंडाची तरतूद आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत गैरप्रकारांचा तपास

परीक्षा गैरप्रकारांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय असल्याने अशा गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस समितीने केली आहे. सध्या पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो. त्याऐवजी जिल्ह्यांमध्ये किमान अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात किमान पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे परीक्षा गैरप्रकारांमागील संघटित यंत्रणा, संबंधित व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध अधिक प्रभावी तपास करणे शक्य होणार आहे.

विशेष कृती दलाची स्थापना

परीक्षा गैरप्रकारांमधील गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दल स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे. संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी या दलाला विशेष अधिकारक्षेत्र देण्याची तरतूद करण्याचेही सुचविण्यात आले आहे.

विशेष जलदगती न्यायालये

परीक्षा गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांचे खटले दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत आणि दोषींवर वेळेत कारवाई व्हावी, यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत सध्या प्रलंबित असलेले सर्व जुने खटलेही या विशेष न्यायालयांकडे वर्ग करून तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याची शिफारस समितीने केली आहे.

Read About : Tehsildar Offices – नागपूर, नाशिक, जळगावसह धुळे, नंदुरबारमध्ये 9 अपर तहसिलदार कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.