Ad Advertisement Ad Advertisement

Mercury to Gold : पाऱ्यापासून सोने बनवणे शक्य आहे का?

न्यूक्लियर ट्रान्सम्युटेशन प्रक्रियेद्वारे प्रयोगशाळेत तयार केले कृत्रिम सोने, मात्र खर्च कोट्यवधींच्या घरात!

मुंबई : Mercury to Gold प्राचीन काळापासूनच किमयागारांना पाऱ्यासारख्या सामान्य धातूपासून सोने तयार करण्याचे वेध लागले होते. आज आधुनिक विज्ञानाने हे स्वप्न प्रत्यक्षात आणले असून, पाऱ्यापासून सोने तयार करणे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे शक्य झाले आहे. मात्र, ही प्रक्रिया इतकी महागडी आणि गुंतागुंतीची आहे की व्यावसायिकदृष्ट्या तिचा वापर करणे अशक्य आहे.

विज्ञानाच्या नियमानुसार कोणत्याही मूलद्रव्याची ओळख त्याच्या अणूच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येवर ठरते. आवर्तसारणीमध्ये पाऱ्याचा अणुक्रमांक ८० आहे, तर सोन्याचा अणुक्रमांक ७९ आहे. याचाच अर्थ पार्याच्या अणूतून जर एक प्रोटॉन यशस्वीरित्या बाहेर काढला, तर त्याचे रूपांतर थेट सोन्याच्या अणूमध्ये होते.

ही किमया साध्या रासायनिक प्रक्रियेने, उष्णतेने किंवा कोणत्याही रसायनांच्या मिश्रणाने साधता येत नाही. यासाठी न्यूक्लियर ट्रान्सम्युटेशन या अणुभौतिकीच्या प्रक्रियेचा वापर केला जातो. यामध्ये अणुभट्टी किंवा पार्टिकल ॲक्सिलरेटरच्या साहाय्याने पाऱ्याच्या अणूंवर प्रचंड वेगाने न्यूट्रॉन किंवा इतर सूक्ष्म कणांचा मारा केला जातो. १९४१ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या पद्धतीचा वापर करून प्रयोगशाळेत यशस्वीरित्या कृत्रिम सोने तयार केले होते.

परंतु, या पद्धतीने सोन्याचे उत्पादन घेणे व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत तोट्याचे ठरते. अणुभट्टी किंवा पार्टिकल ॲक्सिलरेटर चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि यंत्रणेचा खर्च हा त्यातून तयार होणाऱ्या सोन्याच्या बाजारभावापेक्षा लाखो पटीने अधिक असतो. याशिवाय, या प्रक्रियेतून तयार होणारे सोने हे अनेकदा अस्थिर आणि किरणोत्सर्गी असते. ते मानवी वापरासाठी धोकादायक ठरू शकते आणि त्याचा किरणोत्सर्ग पूर्णपणे नष्ट होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रयोगशाळेत पाऱ्यापासून सोन्याचे काही सूक्ष्म कण तयार करणे विज्ञानाला शक्य झाले असले, तरी त्यातून दागिने बनवणे किंवा आर्थिक नफा मिळवणे आजही केवळ एक स्वप्नच आहे.

Read About : Space Plant Disease Experiment : चंद्र आणि मंगळावर शेतीसाठी अंतराळात वनस्पतींची चाचणी

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.