वीज वहनातील ऊर्जेची गळती थांबवण्याच्या संशोधनाला मोठे यश; नेदरलँड्स आणि जर्मनीतील शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध, सुपरकंडक्टिव्हिटीच्या नव्या शक्यता उघड
उट्रेच (नेदरलँड्स) : Room Temperature Superconductor विज्ञानाच्या जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या रूम-टेम्परेचर सुपरकंडक्टरच्या (सामान्य तापमानाला काम करणारे अतिवाहक) शोधात शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठ, लीडेन विद्यापीठ आणि जर्मनीतील म्युनिक येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. कोणत्याही विरोधाशिवाय वीज वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रॉन पेअर्स हे सामान्य तापमानालाही स्थिर राहू शकतात, असा महत्त्वपूर्ण शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे.
आतापर्यंत असे मानले जात होते की, सुपरकंडक्टिव्हिटीसाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनची जोडी ही केवळ अतिशीत तापमानालाच (उणे २६० अंश सेल्सिअसच्या आसपास) तयार होऊ शकते. मात्र, उट्रेच विद्यापीठाचे संशोधक इंगमार स्वार्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका विशेष उपकरणाच्या साहाय्याने क्युप्रेट पदार्थांचा अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले की, इलेक्ट्रॉन जोड्यांना एकत्र ठेवणारी ऊर्जा सामान्य तापमानालाही टिकून राहते.
सुपरकंडक्टिव्हिटी साध्य करण्यासाठी दोन प्रमुख अटी असतात. पहिली म्हणजे इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार होणे आणि दुसरी म्हणजे या सर्व जोड्यांनी एकाच लयीत एकत्रितपणे प्रवास करणे. या संशोधनातून पहिली अट सामान्य तापमानाला पूर्ण होऊ शकते हे सिद्ध झाले असून, आता केवळ या जोड्यांना एका लयीत आणण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर उरले आहे. या शोधामुळे वीज वहनादरम्यान होणारी ऊर्जेची गळती पूर्णपणे थांबवून ऊर्जेची प्रचंड बचत करणारी यंत्रणा उभारणे शक्य होईल.
Read About : Space Plant Disease Experiment : चंद्र आणि मंगळावर शेतीसाठी अंतराळात वनस्पतींची चाचणी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.