पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप : अशी एक नव्हे तर २७ प्रकरणे असल्याचा केला दावा
छत्रपती संभाजीनगर 5 Crore Commission Allegation Shirsat : सामाजिक न्याय विभागाकडे ‘आरती सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून उदगीरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २५ कोटींच्या या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्र्यांनी २० टक्के (५ कोटी) कमिशन मागितले, असा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत केला.
राऊत म्हणाले की, मातंग समाज आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लातूरचे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयात सविस्तर प्रस्ताव सादर केलेला होता. प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली होती, असे असूनही त्यास मंजुरी मिळाली नाही.
या काळात ते सातत्याने मंत्रालयाचे हेलपाटे मारत होते. मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी त्यांना प्रस्तावावर पुढील कार्यवाहीसाठी मंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले. मुंबईतील नाथानी हाईट्स इमारतीमधील मंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी रात्री ११:३० त्यांची भेट झाली, यावेळी प्रस्तावाची माहिती घेतल्यानंतर प्रकल्प मंजुरीसाठी २० टक्के रक्कम देण्याची मागणी त्यांना करण्यात आली होती. पाच कोटी रुपये दिल्याशिवाय प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. उदगीरकर यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी हा प्रकार मला सांगितल्याचे खासदार राऊत म्हणाले. कमिशन न दिल्याने प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलेली नाही, असा दावाही खा. राऊत यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची सत्यता पडताळून घ्यावी, उदगीरकर यांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असेही खा. राऊत म्हणाले.
अशी २७ प्रकरणे आपल्याकडे असल्याचा दावा
या प्रकरणात उदगीरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रार दिली होती. मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट तक्रारीची माहिती मंत्र्यांना देण्यात आल्याचेही खा.राऊत म्हणाले. तसेच आपल्याकडे मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित अशी २७ प्रकरणे असल्याचा दावा खा. राऊत यांनी केला. कोणत्या प्रस्तावांसाठी किती रकमेची मागणी करण्यात आली, याची माहिती माझ्याकडे असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणांची चौकशी करून, शिरसाट यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
आरोप बिनबुडाचे : मंत्री शिरसाट
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही पत्रकार परिषद घेऊन खा.राऊत यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचे पुरावे कुणाकडे असतील तर ते समोर आणावेत, असे आवाहनही केले. दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार मंत्र्यांना नसतात, असे प्रस्ताव मुख्यमंत्री स्तरावर मंजुरीसाठी पाठवले जातात., असेही शिरसाट यांनी सांगितले. सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप केले जात असून, याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशाराही मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिला.
Read About : Maharashtra Suspends Microfinance Loan – मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीला आठ महिने स्थगिती : बावनकुळे
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.