तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : Maharashtra Infrastructure Investment 100 Billion – मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. 300 किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्याने निश्चित केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे (वर्ल्ड मेयर्स फोरम) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेस केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजकिशोर मोदी यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक, लोकप्रतिनिधी आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी देशभरातील यशस्वी नागरी उपक्रम आणि उत्तम कार्यपद्धतींचे संकलन असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
शहरे आर्थिक विकासाची इंजिने
शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे 65 टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्वाचे आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इच्छाशक्ती आणि नियोजन महत्त्वाचे
महाराष्ट्राची 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सुमारे 400 शहरांमध्ये, तर उर्वरित लोकसंख्या सुमारे 40 हजार गावांमध्ये राहते. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम राहणीमान निर्माण करून राज्यातील निम्म्या लोकसंख्येच्या जीवनमानात सुधारणा करण्याची मोठी संधी आहे.शहरांच्या विकासासाठी केवळ मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते तर, त्यासाठी इच्छाशक्ती, ठाम निर्धार आणि योग्य नियोजन महत्त्वाचे असते. जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी भांडवल उपलब्ध आहे; मात्र, त्यासाठी व्यवहार्य आणि दर्जेदार प्रकल्प तयार ठेवणे आवश्यक आहे. प्रकल्पांचे योग्य नियोजन केल्यास गुंतवणूक आपोआप आकर्षित होते, असे फडणवीस यांनी नमूद केले.
यशस्वी मॉडेलचा स्वीकार करा
प्रत्येक शहराने दुसऱ्या शहरातील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करावी. इंदूर, अहमदाबाद आणि मुंबई यासारख्या शहरांतील चांगल्या कार्यपद्धतींचा इतर शहरांना उपयोग होऊ शकतो. प्रत्येक वेळी नव्याने प्रयोग करण्याऐवजी यशस्वी मॉडेलचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
Read About : Public Festival Noise Pollution 2026 – उत्सव साजरे करा; मात्र नागरिकांना सक्तीचे श्रोते बनवू नका!
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.