Advertisement Advertisement

Love Formula : प्रेमाचेही असते गणित! नाते टिकवण्याचा ‘लव्ह फॉर्म्युला’

भावना, आकर्षण आणि संवादाच्या आधारे नात्यांचे गणिती मॉडेल, भविष्यात AI ठरू शकतो नात्याचा ‘GPS’

लिऑन : प्रेमाला कोणतेही ठरावीक गणित नसते, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, फ्रान्समधील लिऑन विद्यापीठातील प्राध्यापक पूजा-में जुए आणि जगभरातील संशोधकांनी प्रेमसंबंधांचा गणिती पद्धतीने अभ्यास करून धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. त्यांच्या मते, नात्यातील भावना काळानुसार कशा बदलतात, संघर्षानंतर त्या पुन्हा कशा सुधारतात किंवा कमी होतात, याचे काही नमुने गणिती मॉडेलद्वारे समजून घेता येतात.

या संशोधनाची मुळे प्राण्यांच्या संख्येच्या अभ्यासात आहेत. मॉल्थसच्या जनसंख्या सिद्धांतापासून ‘प्रिडेटर-प्रे’ मॉडेलपर्यंतच्या गणिती पद्धतींचा पुढे मानवी नातेसंबंध समजून घेण्यासाठी वापर झाला. मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमन यांनी जोडप्यांमधील संवादाचे विश्लेषण करून नात्यांच्या स्थैर्याचा अभ्यास करण्यास गणिताची मदत घेतली.

नाते टिकवण्यासाठी भावना महत्त्वाची

संशोधकांच्या मते, प्रत्येक नात्याची एक विशिष्ट स्थैर्य मर्यादा असते. भावना या मर्यादेपेक्षा सातत्याने खाली गेल्यास नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ शकते. मात्र, योग्य वेळी संवाद आणि सकारात्मक बदल केल्यास परिस्थिती सुधारता येऊ शकते.
नात्यावर तीन प्रमुख शक्ती परिणाम करतात—परस्पर आकर्षण, कालांतराने कमी होणाऱ्या भावना आणि जोडीदाराच्या भावनिक प्रतिक्रियांचा प्रभाव. तणाव, आजार, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक समस्या यानंतर जोडपे किती लवकर पूर्वस्थितीत येते, हेही महत्त्वाचे ठरते.

‘एआय’ (AI) बनेल नात्याचा ‘जीपीएस’?

भविष्यात गणिती मॉडेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय / AI) एकत्र करून नात्यातील धोका आधीच ओळखणारी प्रणाली तयार करण्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात. मात्र प्रेमाला पूर्णपणे समीकरणात बांधता येणार नाही. संस्कृती, परिस्थिती आणि मानवी स्वभावातील बदल यामुळे प्रत्येक नाते वेगळे असते. अखेरीस नाते टिकवण्याचा निर्णय गणित नव्हे, तर दोन व्यक्तींची इच्छा आणि प्रयत्न ठरवतात.