Ad Advertisement Ad Advertisement

AI Galaxy Simulation : एआयच्या मदतीने आकाशगंगेचे सिम्युलेशन आता 20 पट वेगवान; जपानी शास्त्रज्ञांचे मोठे यश

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ‘फेझंट’ तंत्रज्ञानामुळे आकाशगंगेतील ताऱ्यांची हालचाल आणि सुपरनोव्हा स्फोटांचा अभ्यास २० पट अधिक वेगाने करणे शक्य होणार

टोकियो (जपान) : AI Galaxy Simulation टोकियो विद्यापीठ आणि जपानची अग्रगण्य संशोधन संस्था रिकेन येथील शास्त्रज्ञांनी फेझंट नावाचे एक क्रांतिकारी सिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण आकाशगंगेतील प्रत्येक ताऱ्याची हालचाल आणि ताऱ्यांचे महास्फोट नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा तब्बल २० पट अधिक वेगाने आणि अचूकपणे अभ्यासता येणे शक्य झाले आहे.

आतापर्यंत आकाशगंगेसारख्या विशाल प्रणालीचे सिम्युलेशन करणे शास्त्रज्ञांसाठी मोठे आव्हान होते. टोकियो विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागातील प्राध्यापक मिचिको फुजी यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या ताऱ्याचा सुपरनोव्हा स्फोट होतो, तेव्हा त्याभोवतीचा वायू प्रचंड तापतो आणि वेगाने बाहेर फेकला जातो. पारंपरिक संगणकीय पद्धतीत या सूक्ष्म बदलांची मोजणी करण्यासाठी अत्यंत लहान कालावधीचे टप्पे घ्यावे लागत होते, ज्यामुळे प्रत्यक्ष सिम्युलेशनला अनेक महिने किंवा वर्षे लागत असत.

ही अडचण दूर करण्यासाठी रिकेनचे संशोधक केइया हिराशिमा यांनी एक विशेष एआय मॉडेल तयार केले. सुपरनोव्हा स्फोटानंतर सभोवतालच्या वायूमध्ये कालांतराने कोणते बदल होतील, याचा अचूक अंदाज हे एआय मॉडेल वर्तवते. यामुळे मुख्य सिम्युलेशनला लहान-सहान क्लिष्ट आकडेमोड वगळता येते आणि संपूर्ण प्रक्रियेचा वेग २० पटीने वाढतो. विशेष म्हणजे, ऑरोरा, फ्रंटियर आणि ज्युपिटर यांसारख्या जगातील सर्वात शक्तिशाली एक्सास्केल सुपरकॉम्प्युटरवर हे मॉडेल यशस्वीरीत्या चालवण्यात आले असून, प्रतिष्ठित गॉर्डन बेल पारितोषिकाच्या अंतिम फेरीतही या संशोधनाने स्थान मिळवले आहे.

Read About : Horizon Supercomputer : अमेरिकेतील शक्तिशाली शैक्षणिक सुपरकॉम्प्युटर होरायझन कार्यान्वित; 132 पेटाफ्लॉप्स वेगाने करणार संशोधन
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.