Ad Advertisement Ad Advertisement

Cambridge Word of the Year 2026 : ‘Human’ ठरला वर्षातील शब्द; AI च्या वाढत्या प्रभावाची चिंता

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मानवी भावना, सर्जनशीलता आणि विचारशक्तीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित; ‘Agent’ आणि ‘Analogue’ हे शब्दही होते स्पर्धेत.

लंडन : Cambridge Word of the Year 2026 कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) दैनंदिन जीवनातील वाढता हस्तक्षेप आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेचे प्रतिबिंब यंदाच्या वर्षातील शब्दामध्ये उमटले आहे. केंब्रिज शब्दकोशाने २०२६ साठी ‘ह्युमन’ या शब्दाची निवड वर्षातील शब्द म्हणून केली आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात माणसाचे वेगळेपण, भावना आणि विचार करण्याची क्षमता यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा या निवडीमागे प्रयत्न आहे.
केंब्रिज डिक्शनरीचे शब्दतज्ज्ञ कॉलिन मॅकिंटॉश यांच्या मते, एआयमुळे माणूस असण्याचा अर्थ नव्याने तपासण्याची वेळ आली आहे. विचार करण्याची जबाबदारी तंत्रज्ञानाकडे सोपवल्यास मानवी क्षमतांचे काय होईल, याविषयी गणितज्ञांपासून शिक्षकांपर्यंत विविध क्षेत्रांत चर्चा सुरू आहे.

‘ह्युमन’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘ह्युमनस’ या शब्दापासून आला आहे. १४५० च्या दशकापासून वापरात असलेल्या या शब्दाचा अर्थ देव, प्राणी किंवा यंत्रांपेक्षा वेगळे असलेले मानवी गुण, भावना आणि मर्यादा असा केंब्रिज डिक्शनरीने स्पष्ट केला आहे.

एआयशी संबंधित शब्दांची यापूर्वीही निवड

गेल्या काही वर्षांत विविध शब्दकोशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित शब्दांना वर्षातील शब्दाचा मान दिला आहे. २०२३ मध्ये कॉलिन्स डिक्शनरीने ‘एआय’, तर केंब्रिज डिक्शनरीने ‘हॅलुसीनेट’ हा शब्द निवडला होता. एआयकडून चुकीची किंवा बनावट माहिती तयार होण्याच्या प्रवृत्तीशी हा शब्द संबंधित आहे. २०२५ मध्ये मेरियम-वेबस्टरने एआयमुळे तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या मजकुरासाठी ‘स्लोप’ हा शब्द निवडला होता. कॉलिन्सने ‘व्हाईब कोडिंग’ या संकल्पनेला महत्त्व दिले होते.

‘एजंट’ आणि ‘ॲनॉलॉग’ हेही चर्चेत

यंदाच्या निवडीसाठी ‘एजंट’ आणि ‘ॲनॉलॉग’ हे शब्दही ‘ह्युमन’च्या स्पर्धेत होते. मानवी नियंत्रणाशिवाय निर्णय घेऊन काम करणाऱ्या एआय प्रणालीला ‘एजंट’, तर डिजिटल तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या वस्तू किंवा अनुभवांना ‘ॲनॉलॉग’ म्हटले जाते.

बिल गेट्स यांच्याकडून निवडीचे स्वागत

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ‘ह्युमन’ या शब्दाच्या निवडीचे स्वागत केले आहे. एआयच्या यशाचे मोजमाप मानवी जीवन किती सुधारते, यावर व्हायला हवे, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्याचा अंतिम उद्देश माणसाचे जीवन अधिक चांगले करणे हाच असावा, हा या निवडीचा महत्त्वाचा संदेश आहे, असे ते म्हणाले.

Read About : Malena and Klepetan Story : मालेनानंतर क्लेपेटानला मिळाली ‘स्नायका’ची साथ; स्टजेपन व्होकिच यांची माणुसकीची कहाणी पुन्हा चर्चेत, 2026
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.