Ad Advertisement Ad Advertisement

Maid Stealing Gold and Silver – रोज थोडे-थोडे दागिने चोरायची; घरमालकाने सीसीटीव्ही बसवून रंगेहात पकडली मोलकरीण, 2 दिवसांची कोठडी

८.४ तोळे सोने, ३२ तोळे चांदी, ५० हजार रोकड चोरल्याचा आरोप : एमआयडीसी सिडको पोलिसांनी केली अटक

छत्रपती संभाजीनगर : Maid Stealing Gold and Silver पती-पत्नी नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्यावर घरकामासाठी येणारी मोलकरीण रोज थोडे-थोडे दागिने चोरायची. दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर घरमालकिणीने विनापुरावा आरोप न करता घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिला पकडण्याचा प्लॅन आखला. नियमित फुटेज तपासताना अखेर ही मोलकरीण लॉकर उघडताना सीसीटीव्हीत कैद झाली आणि रंगेहात सापडली. तिने ८.४ तोळे सोने, ३२ तोळे चांदी आणि ५० हजार रुपये रोकड चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. २४ नोव्हेंबरला इंडोजर्मन टूल रूम क्वॉर्टर भागात हा प्रकार उघडकीस आला.

मोलकरीण सुलोचना (४५, रा. मिसारवाडी) हिला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली असून, चूक झाल्याचे मान्य करून तिने पोलिसांकडे चोरीची कबुली दिली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नीलिमा मनोज ठाकरे (५६, रा. इंडोजर्मन टूल रूम क्वॉर्टर नं. ए-३) या फिर्यादी आहेत. त्या रेल्वे खात्यात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती मनोज ठाकरे हे इंडोजर्मन टूल रूम येथे नोकरी करतात.

पती सकाळी ९ वाजता, तर नीलिमा या सकाळी १० वाजता कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. मागील दहा महिन्यांपासून सुलोचना ही त्यांच्या घरी कामाला येते. दोघेही गेल्यानंतर ती घरकाम करून जात असल्याने नीलिमा या अधूनमधून देवघराच्या बाजूच्या कपाटातील दागिने व किमती ऐवज तपासायच्या. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या आधी त्यांनी कपाट तपासले असता सोन्याचा चोकर, गोप आणि एक अंगठी मिळून आली नाही. त्यांनी दिवाळीपर्यंत या दागिन्यांचा सर्वत्र शोध घेतला; पण ते कुठेही सापडले नाहीत.

चोरीला गेलेला ऐवज

सुलोचना हिने एक-एक तोळ्याचे दोन सोन्याचे गोप, दीड तोळ्याची मोहनमाळ, एक तोळ्याचा चोकर, एक तोळ्याचा कडा, ८ आणि १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ५ ग्रॅम आणि ६ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे वेल असा एकूण ८.४ तोळे सोन्याचा ऐवज तसेच १५, ७ आणि १० तोळे वजनाचे एकूण ३२ तोळे चांदीचे तीन पैंजण जोड व देवघराच्या ड्रॉव्हरमधील ५० हजार रुपये रोकड (५०० रुपयांच्या १०० नोटा) असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा आरोप नीलिमा यांनी फिर्यादीत केला आहे.

संशय येताच घरात बसविला सीसीटीव्ही

दिवाळीपर्यंत शोधूनही दागिने सापडत नसल्याने आणि घरात पती-पत्नीव्यतिरिक्त केवळ सुलोचना येत असल्याने नीलिमा यांना तिच्यावर संशय आला. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आणि त्याचा अ­ॅक्सेस आपल्या मोबाईलमध्ये घेतला. तेव्हापासून सुलोचनाच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. ती विनाकारण घरातील टेबलचे ड्रॉव्हर्स आणि कपाटाचे हँडल तपासत असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले; मात्र थेट पुरावा मिळत नव्हता.

अन् मोलकरीण सीसीटीव्हीत कैद झाली
  • २४ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने नीलिमा घरीच होत्या. सुलोचनाला रंगेहात पकडण्यासाठी त्यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर जाण्याचा बहाणा केला आणि घराबाहेरच थांबून राहिल्या.
  • थोड्या वेळाने त्यांनी मोबाईलवर सीसीटीव्हीचे लाईव्ह फुटेज पाहिले असता, सुलोचना ही देवघराच्या ड्रॉव्हरमधून कपाटाची चावी काढून त्याने कपाटातील सोन्याचे लॉकर उघडताना कैद झाली.
  • त्याचवेळी नीलिमा यांनी घरात प्रवेश करून तिला रंगेहात पकडले; मात्र ती बहाणे करून घरातून निघून गेली. त्यानंतर नीलिमा यांनी देवघराचा ड्रॉव्हर तपासला असता त्यातील ५० हजार रुपयांची रोकडही गायब असल्याचे लक्षात आले.
  • त्यांनी तातडीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुलोचनाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत अधिक तपास करीत आहेत.

Read About: Honey Trap Crime Sambhajinagar – रात्रीचा ‘पुलाव’ पडला महागात; एमआर ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात! – 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.