Bunker film : पेनलोपे क्रुझ आणि हाव्हिएर बार्देम झाले भावुक
व्हेनिस (इटली) : स्पॅनिश सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे पेनलोपे क्रुझ आणि हाव्हिएर बार्देम यांच्या ‘बंकर’ (Bunker) या आगामी चित्रपटाला ८३ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या या चित्रपटाच्या प्रीमियम शोनंतर प्रेक्षकांनी तब्बल १६ मिनिटे उभे राहून टाळ्यांच्या गजरात संपूर्ण टीमचे कौतुक केले. या वर्षीच्या महोत्सवातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी दाद ठरली आहे.
चित्रपटाला मिळालेले हे अभूतपूर्व यश पाहून ५२ वर्षीय अभिनेत्री पेनलोपे क्रुझ अत्यंत भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. याप्रसंगी तिने पती हाव्हिएर बार्देमसह प्रेक्षकांचे आभार मानले. ऑस्करविजेते दिग्दर्शक फ्लोरिअन झेलर यांनी या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका तंत्रज्ञान अब्जाधीशासाठी सर्व्हायव्हल ‘बंकर’ बांधण्याचे काम स्वीकारल्यानंतर एका वास्तुविशारद आणि त्याच्या पत्नीच्या १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात निर्माण होणारा भावनिक व नैतिक संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
दिग्दर्शक फ्लोरिअन झेलर यांनी सांगितले की, त्यांनी ही कथा विशेषत: पेनलोपे आणि हाव्हिएर यांच्यासाठीच लिहिली होती. वास्तविक आयुष्यात पती-पत्नी असलेल्या या दोघांचा एकत्र काम करण्याचा हा ९ वा चित्रपट आहे. या चित्रपटात पेनलोपे क्रुझ आणि हाव्हिएर बार्देम यांच्या व्यतिरिक्त स्टीफन ग्रॅहॅम, पॉल डॅनो आणि पॅट्रिक श्वार्झनेगर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रीमियरनंतर हा चित्रपट टॉरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार असून, या वर्षाच्या शेवटी तो जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.

You need an account to post comments.