Ad Advertisement Ad Advertisement

मतदारसंघ फेररचनेची लढाई आता संसदेत – Delimitation Bill 2026

विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; पुढील २५ वर्षे जागांची संख्या बदलणार नाही
३० नोव्हेंबरला लोकसभेत, तर २ डिसेंबरला राज्यसभेत विधेयक येणार

नवी दिल्ली : Delimitation Bill 2026 मतदारसंघ परिसीमनाशी निगडित महिला आरक्षण विधेयक काही दुरुस्त्यांसह केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करून भाजपने या विधेयकाच्या मंजुरीसाठी संसदेतील लढाईची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. ३० नोव्हेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल आणि १ डिसेंबर रोजी त्यावर मतदान होईल, अशी शक्यता आहे. काँग्रेसने विरोधासाठी दंड थोपटले असले तरी इंडिया आघाडीतील अन्य विरोधी पक्षांमध्ये अद्याप यावर एकवाक्यता नाही. त्यातच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, द्रमुक यांचे सकारात्मक संकेत आणि एनडीएमधील मित्रपक्षांचे संख्याबळ यामुळे विधेयक मंजुरीसाठी संपूर्ण सभागृहात आवश्यक ३५९ सदस्यांचा पाठिंबा मिळवून हे विधेयक मंजूर करवून घेता येईल, असा भाजपचा मनसुबा आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेशी (परिसीमन) संबंधित नवीन महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. याअंतर्गत लोकसभेच्या जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पुढील २५ वर्षे लोकसभेचे संख्याबळ बदलणार नाही, अशी तरतूद या नव्या विधेयकात आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात ३० नोव्हेंबरला लोकसभा, तर २ डिसेंबरला राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सेवा तीर्थ येथे शुक्रवारी दुपारी १ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या वेळी परिसीमन संबंधित महिला आरक्षणाचे नवे विधेयक काही सुधारणांसह मंजूर करण्यात आले. यानुसार, लोकसभेचे संख्याबळ ५० टक्क्यांनी वाढवणार आहे.

संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेच्या सध्या ५४३ जागा आहेत. हे संख्याबळ ८१५ होणार आहे. म्हणजेच यात २७२ जागा वाढणार आहेत. या वाढवलेल्या सर्व जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाऊ शकतात. एकूण जागांची ही संख्या पुढील २५ वर्षे बदलणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर (परिसीमन) कोणत्याही राज्याचा लोकसभेतील जागांचा वाटा इतर राज्यांच्या तुलनेत कमी होऊ नये, यासाठी नवीन विधेयकात काही बदल करण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा अजेण्डा आहे.

दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. वर्ष २०५१ पर्यंत जागांच्या संख्येत कोणताही बदल केला जाणार नाही, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले. नवीन विधेयकात वाढवलेल्या जागांची नव्याने निश्चिती करण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने राज्यांच्या जागांच्या सध्याच्या संख्येत कोणताही बदल न करता संसदीय मतदारसंघांची नव्याने निश्चिती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. यात द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षांकडून या विधेयकाला पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, विरोधी इंडिया आघाडी या विधेयकाच्या विरोधात आहे.

एनडीएचे संख्याबळ

एनडीएची अंदाजित सदस्यसंख्या ३२० आहे, ज्यामध्ये भाजपचे २४१ खासदार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ७९ खासदार समाविष्ट आहेत. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय)चे २०, तेलुगू देसम पार्टी (टीडीपी)चे १६, शिवसेनेचे १३, जनता दल (युनायटेड)चे १२, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे ५, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी)चे २, जनसेना पार्टी (जेएसपी)चे २ आणि जनता दल (सेक्युलर)चे २ खासदार आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी), शिरोमणी अकाली दल, आसाम गण परिषद (एजीपी), एजेएसयू, अपना दल (एस), हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या प्रत्येक पक्षाचा एक-एक खासदार आहे.

संसदीय प्रतिनिधित्वात मोठी तफावत

गेल्या काही दशकांत लोकसंख्येतील असमान वाढीमुळे संसदीय प्रतिनिधित्वात मोठी तफावत निर्माण झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, बिहारमधील एक खासदार सुमारे २६ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, तर उत्तर प्रदेशमधील एक खासदार सुमारे २५ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. याउलट, तामिळनाडूमध्ये हे प्रमाण १८.५ लाख आणि केरळमध्ये १६.७ लाख इतके आहे. लोकसभेच्या जागांचे लोकसंख्येच्या आधारावर पुनर्वितरण व्हावे, असे मानणाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याची विषमता ‘समान प्रतिनिधित्व’ या तत्त्वाच्या विरोधात आहे. मात्र, दक्षिण भारतातील राजकीय पक्षांचे असे मत आहे की, त्यांच्या जागांची एकूण संख्या वाढली, तरी लोकसभेत त्यांचा हिस्सा कमी होईल. यामुळे राष्ट्रीय धोरण ठरवताना, विशेषत: केंद्र आणि राज्यांदरम्यान आर्थिक संसाधनांचे वाटप करण्यासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये, त्यांचा प्रभाव कमी होईल.

संख्याबळावर सारे अवलंबून

लोकसभेची मंजूर सदस्यसंख्या ५४३ आहे. सध्या पाच जागा रिक्त असल्याने प्रत्यक्ष सदस्यसंख्या ५३८ इतकी आहे. जर सर्व ५३८ सदस्यांनी मतदान केले, तर घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला ३५९ मतांची आवश्यकता असेल. सध्याच्या संख्याबळानुसार एनडीएकडे ३९ मतांची कमतरता आहे. मात्र, प्रत्यक्ष सभागृहात किती खासदार उपस्थित राहून मतदान करतात, त्यानुसार आवश्यक मतांचा आकडा बदलू शकतो.

काँग्रेसकडून व्हीप जारी

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहण्याकरता काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला. लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत खासदारांनी नवी दिल्लीत पोहोचावे, असेही पक्षाने सांगितले. लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबर रोजी आणि राज्यसभेची बैठक २ डिसेंबर रोजी पुन्हा बोलावण्यात आली आहे.

Read About : संसदेचे विशेष अधिवेशन – Parliament special session 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.