चार जणांनी कार अडवून १६ किलो ४०० ग्रॅम सोने केले लंपास
नवी मुंबई : 20 Crore Gold Robbery झवेरी बाजारातून नेरूळ एमआयडीसीकडे नेले जाणारे तब्बल २० कोटी रुपये किमतीचे १६ किलो ४०० ग्रॅम सोने एका कारमधून आलेल्या चार जणांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना येथील शिरवणे एमआयडीसी परिसरात गुरुवारी रात्री घडली. या चौघांनी सोन्याची वाहतूक करणारी कार अडवून काचा लोखंडी रॉडने फोडून सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून ठाण्याच्या दिशेने पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास तुर्भे पोलिसांसह गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
ही घटना गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. लक्ष्मण घुरो मुखिया (५५) हे नेरूळ एमआयडीसीतील चैन ॲण्ड चैन कंपनीचे तब्बल २० कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन कारने नेरूळच्या दिशेने जात होते. या वेळी कारमध्ये त्यांच्यासोबत कंपनीतील इतर दोन कर्मचारी होते. त्यांची कार नेरूळ येथील शिरवणे एमआयडीसीतील सर्व्हिस रोडवर रहेजा साईटजवळ आली असता, त्यांचा पाठलाग करत वॅगनआर कारमधून आलेल्या चौघांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर लुटारूंनी लोखंडी रॉडने कारच्या समोरील आणि चालकाच्या बाजूची काच फोडली.
दरम्यान, कारचालकाने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका लुटारूने त्यांच्या चेहऱ्यावर रॉडने प्रहार केला. यात त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. त्यानंतर लुटारूंनी कारमधील सुमारे २० कोटी रुपये किमतीचे १६ किलो ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे, चेन आणि अन्य दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि कारमध्ये बसून ते ठाण्याच्या दिशेने पसार झाले.
संशयितांचे वय अंदाजे २२ ते ३५ वर्षे
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त, वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा कक्ष-१ आणि तुर्भे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या चारही संशयितांचे वय अंदाजे २२ ते ३५ वर्षे असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास तुर्भे पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनदेखील करण्यात येत असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.