पाणीटंचाई, सिंचन व चारा नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; नियमबाह्य बोअरवेल खोदणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
नांदेड : Nanded Drought Management – जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून जबाबदारी पार पाडावी. नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. मंजूर उपाययोजना निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा, उन्हाळी पाणी नियोजन आणि चारा उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सुरू करण्यात आलेल्या ‘संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप २०२७’च्या शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
टँकरद्वारे पाणीपुरवठा, विंधन विहिरी, खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढण्याची कामे प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून उन्हाळ्यातील पाणीपाळ्यांचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
नियमबाह्य बोअरवेल खोदल्यास कठोर कारवाई! जमिनीतील पाणीपातळी खालावत असताना नियमांचे उल्लंघन करून २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्डिले यांनी दिला. तसेच जलतारा कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा पिकांची लागवड, उपलब्ध साठा आणि पशुधनाची मागणी यांचे आतापासूनच नियोजन करण्यास सांगण्यात आले. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानातील कामांचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Read About : नांदेडमध्ये ऑनलाइन खत विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद – Nanded Online Fertilizer Booking
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.