Ad Advertisement Ad Advertisement

नांदेडमध्ये ऑनलाइन खत विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद – Nanded Online Fertilizer Booking

• 35 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केले खत बुकिंग | • एफएफएस प्रणालीद्वारे 10 हजार 845 मे. टन खत आरक्षित; पारदर्शक खत विक्रीसाठी प्रशासनाचे प्रयत्न

नांदेड : Nanded Online Fertilizer Booking : नांदेड जिल्ह्यात दि. 22 ऑक्टोबर 2026 पासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या भ्रमणध्वनी आधारित अनुप्रयोगाद्वारे ऑनलाइन खत खरेदी-विक्री सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलद्वारे खताचे आरक्षण करता येत असून, रब्बी हंगामात गेल्या महिनाभरात 35 हजार 453 शेतकऱ्यांनी 42 हजार 35 हेक्टर क्षेत्रासाठी 10 हजार 845 मेट्रिक टन खताचे आरक्षण केले आहे. त्यापैकी 9 हजार 131 मेट्रिक टन खताची प्रत्यक्ष विक्री झाली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी 1 हजार 500 शेतकरी खताचे आरक्षण करीत असून, सुमारे 430 मेट्रिक टन खताचे दररोज आरक्षण होत आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आवश्यक खत, कृषी सेवा केंद्रांवरील उपलब्ध खत साठ्याची माहिती मिळते. खत खरेदीची पारदर्शक नोंद राहते, गरजेपेक्षा जास्त खरेदीला आळा बसतो आणि वेळेवर खत उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच कृत्रिम खत टंचाई, साठेबाजी, जादा दराने विक्री आणि खताचा अकृषक वापर रोखण्यास या प्रणालीची मदत होत आहे.

ऑनलाइन खत खरेदी प्रणालीच्या प्रारंभी काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी दीर्घकालीन दृष्टीने पारदर्शक खत विक्री व्यवस्था विकसित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना ऑनलाइन खत खरेदी-विक्री प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, किरकोळ खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अनुप्रयोगात वेळोवेळी आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांनी ऑनलाइन आरक्षित केलेले खत प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध राहावे, यासाठी तालुक्यातील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रांवरील विक्री यंत्रातील ऑनलाइन खत साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील खत साठा यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑनलाइन खत खरेदी-विक्री प्रणाली अधिक प्रभावीपणे कार्यरत असून, शेतकऱ्यांचा या सुविधेला वाढता प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी दिली आहे.

Read About : ठिबक सिंचनातून 70 टक्क्यांपर्यंत पाणी बचतीचा दावा; रशियाची कृषी तंत्रे चर्चेत – Climate-Smart Agriculture Technology
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.