Ad Advertisement Ad Advertisement

रा. स्व. संघाच्या नावाने बनावट पत्राचा सोशल मीडियावर खेळ; दोघांवर गुन्हा! RSS Fake Letter Case

‘अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य’ या बनावट पदनामाचा वापर; RSS/2026/001 क्रमांकाने दिशाभूल केल्याचा आरोप

नांदेड : RSS Fake Letter Case राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा गैरवापर करून बनावट निवेदन तयार करणे आणि ते फेसबुकवर व्हायरल करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दत्ता देऊलवाड (रा. कोल्हारी, ता. किनवट) आणि गोविंद बोयने (रा. नांदेड) या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संघाचे स्वयंसेवक नवनाथ पांडुरंग कांबळे (वय ३६, रा. बळीरामपूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी फेसबुकवरील ‘Govind Boyane’ या अकाउंटवर ‘अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य’ या पदनामाने तयार केलेले निवेदन आणि बॅनर प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

विशेष म्हणजे, हे निवेदन अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्यावर RSS/2026/001 असा जावक क्रमांकही नमूद करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संघटनेत असे कोणतेही अधिकृत पद नसताना बनावट पदनाम आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा वापर करून शासकीय यंत्रणा व सामान्य नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकारातून संघटनेची बदनामी करण्यासह समाजात गैरसमज आणि तेढ निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीची दखल घेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.०२ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३४०(२), ३५३(२) आणि ३(५) अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिवाजी जलबाजी देवडे करीत आहेत.

सोशल मीडियावर एखाद्या प्रतिष्ठित संघटनेच्या नावाने बनावट निवेदन तयार करून ते अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Read About : अवैध सावकारीचा पर्दाफाश! ज्ञानेश्वर कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल – Illegal Moneylending Nanded
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.