Ad Advertisement Ad Advertisement

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकलोकशाहीसाठी घातक – राहुल गांधी- 850 Lok Sabha seats proposal

८५० जागा म्हणजे थेटपणे लोकशाहीची हत्या

नवी दिल्ली : 850 Lok Sabha seats proposal प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाद्वारे भाजप देशाचा निवडणूक नकाशा आपल्या सोयीनुसार बनवून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ८५० जागा म्हणजे थेटपणे लोकशाहीची हत्या आहे, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. दुसरीकडे राहुल गांधी यांनी केलेले दावे बिनबुडाचे असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. ‘इंडिया आघाडी’च्या दोन तास चाललेल्या बैठकीनंतर स्वतंत्र पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

भाजप देशाला ‘हुकूमशाही’कडे ढकलत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भारताचा निवडणूक नकाशा पुन्हा आपल्या सोयीनुसार आखण्यासाठी ‘कोरा कॅन्व्हास’ देण्याचा हा कुटील डाव आहे. मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे देशाचा पायाच बदण्याचा भाजपचा हा नवा मार्ग आहे. निवडणूक आयोगावर ताबा मिळवल्यानंतर आता सरकारला परिसीमन आयोगावरही ताबा मिळवायचा आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी केला. मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे विरोध करणाऱ्या समुदायांचे प्रतिनिधित्व कमकुवत केले जाईल. त्याचबरोबर विरोधी पक्षातील ठराविक नेत्यांना लक्ष्य करण्यात येईल.

पुढील ४० वर्षे सामाजिक न्यायाचा विसर पडेल

एकही मत पडण्यापूर्वीच या योजनेमुळे भाजपला मोठा फायदा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे निवडलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच मतदारसंघ पुनर्रचना ठरवतील, असे सांगत त्यांनी या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना बाजूला सारून वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे पुढील ४० वर्षे सामाजिक न्यायाचा विसर पडेल आणि एससी, एसटी व अल्पसंख्याकांचे हक्क डावलले जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

देशात ‘मतचोरी’ होत असल्याचे जेन-झीच्या लक्षात आले असून, ते आपल्यासोबत असल्याचे राहुल म्हणाले. त्याचबरोबर २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अवैध असून, मोदी हे बेकायदेशीर पंतप्रधान असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खोटे बोलण्यात ‘सुपर पीएचडी’

दुसरीकडे राहुल गांधी हे महिलाविरोधी असून, खोटे बोलण्यात त्यांची ‘सुपर पीएचडी’ आहे, असा पलटवार करत भाजपचे वरिष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेत्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read About : मतदारसंघ फेररचनेची लढाई आता संसदेत – Delimitation Bill 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.