Ad Advertisement Ad Advertisement

Bharat Scouts and Guides – ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

पाच कोटी सदस्यसंख्येचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : Bharat Scouts and Guides – ‘भा रत स्काउट्स अँड गाईड्स’ या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संघटनेच्या 13व्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. हा पदभार स्वीकारताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील 80 लाख सदस्यांच्या वतीने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगून, संघटनेची सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

भारत स्काऊट आणि गाईड यांच्यावतीने मुंबईतील वर्षा या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कार्यक्रमास ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या उपाध्यक्ष प्रतिभा पांड्या, मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल, अतिरिक्त मुख्य राष्ट्रीय आयुक्त एम. ए. खालिद, राष्ट्रीय आयुक्त (स्काऊट) मनीषकुमार मेहता, अतिरिक्त आंतरराष्ट्रीय आयुक्त मधुसूदन अवला, डीएएन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सनी पांड्या यांच्यासह भारत स्काऊट अँड गाईड्सचे वरिष्ठ पदाधिकारी, मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते.

राष्ट्र आणि समाजाप्रती समर्पणाची भावना

कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य हे सेवा आणि शिस्तीतून घडत असते. देशाचे नागरिक आणि विशेषतः तरुण पिढी ज्या प्रकारचे चारित्र्य अंगीकारते, त्यावरच त्या राष्ट्राचे भविष्य अवलंबून असते. युवा पिढीला योग्य दिशा देऊन त्यांच्यामध्ये सेवा, शिस्त आणि राष्ट्र तसेच समाजाप्रती समर्पणाची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या माध्यमातून केले जाते. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही संघटना एका भक्कम पुलाचे काम करत असून, ही एक मोठी राष्ट्रसेवा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

विकसित भारताचा खरा पाया तरुण पिढी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047पर्यंत ‘विकसित भारताचे’ जे स्वप्न पाहिले आहे, त्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे. या विकसित भारताचा खरा पाया आणि आधारशिला आपली मुले व तरुण पिढी आहे. योग्य वयात मुलांवर चांगले संस्कार झाल्यास पुढे जाऊन तीच मुले सुसंस्कृत पिढीचे नेतृत्व करतात. त्यामुळे 2047च्या विकसित भारतामध्ये सेवा आणि शिस्तीने परिपूर्ण तरुण राष्ट्रीय आणि सामाजिक चेतनेचे नेतृत्व करतील, यासाठी संघटनेचा हा पाया अधिक मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटनेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध

या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अत्यंत चांगले कार्य झाले असून, आगामी काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या पूर्ण क्षमतेने संघटनेला अधिक पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्य आणि नीतिमत्तेशी घट्ट नाते असलेली एक सेवारत, शिस्तबद्ध आणि संवेदनशील युवा पिढी घडवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी, भारत स्काऊट आणि गाईडचे 13वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल भारत स्काऊट आणि गाईड यांच्या टीमच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना अध्यक्षीय सनद आणि स्काऊट स्कार्फ प्रदान करण्यात आला.

Read About : चंद्रपुरात वाघाच्या अवयवांची नातेवाईकांत वाटणी – Chandrapur tiger poaching case

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.