AI Agents : टोळधाड अचानक येते आणि बघताबघता अख्खं शेत खलास करते. लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या या किटकांना थांबवू शकत नाही. जगभरातल्या टोळधाडीच्या बातम्या ऐकल्या की असं वाटतं की, शेकडो एकरांची शेतं हे टोळ काही तासांत कसे नष्ट करत असतील? आता सध्या अशीच एक टोळधाड मानवी अस्तित्वावर घोंगावतेय. ती टोळधाड आहे एआय एजंट्सची. हे टोळ तयार केले आहेत माणसानेच. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, हे मानवजातीलाच नष्ट करू शकतात हे माहीत असूनही त्यांना थोपवण्यासाठी आजच्या तारखेपर्यंत तरी काही ठोस उपाय आखले गेले नाहीत.
एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेली ही भीती अनाठायी आहे का? एआय कंपन्याच हे कबूल करत आहेत की ही भीती अनाठायी नाही, उलट गेल्या काही दिवसांतल्या घटनांमुळे एआय माणसाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागली आहे हे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या घटनांत एक अतिशय गंभीर घटना नुकतीच घडली. एका राष्ट्रप्रमुखानेच आपल्या देशाच्या संगणक प्रणालीत एआय घुसल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲंथनी ॲल्बनीज यांनी ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटमध्ये ओपन एआयच्या बेकाबू एआय एजंटनी घुसखोरी केल्याची माहिती गेल्या आठवड्यात दिली आणि जगभरातले लोक चक्रावले. हे हॅकिंग प्रकरण घडले जून महिन्यात, ज्याची माहिती ओपन एआयला ऑगस्टमध्ये मिळाली, ती माहिती ऑस्ट्रेलियन सरकारला सप्टेंबरमध्ये मिळाली. म्हणजे दोनएक महिने आपल्या यंत्रणेत एआय लुडबूड करत आहे याबद्दल सरकारला माहितीच नव्हती.
आजपर्यंत कोणत्याही देशाच्या सरकारी कामात एआयने ढवळाढवळ केली नव्हती. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे ओपन एआयचे एजंट्स हगिंगफेस या खाजगी कंपनीत शिरले आणि त्यांनी ओपन एआयच्या नकळत अक्षरश: बंडाचा झेंडा उभारला होता. हे प्रकरण संपते न संपते तोच आता हे प्रकरण समोर आले आहे. अर्थातच ऑस्ट्रेलियन सरकार संतापले आहे. ओपन एआयचा प्रमुख सॅम अल्टमन ओपन एआयची बाजू लावून धरत आहे, पण आम्ही जरूर पडल्यास पोलीस कारवाई करू अशी धमकी ऑस्ट्रेलियन सरकारने दिली आहे.
गेल्या सहा-आठ महिन्यांत एआयचा माणसाला किती उपयोग होईल याबद्दल चर्चा सुरू होती. मानवाच्या विकासासाठी आणि संपन्न आयुष्यासाठी जे संशोधन सुरू आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अतिशय कमी काळात पूर्ण होईल अशी आशा आहे. ज्या गणिती प्रश्न सोडवण्यासाठी गणिततज्ज्ञ दशकांनुदशके काम करत आहेत, ते प्रश्न एआय काही तासांत सोडवत आहे. माणूस जरी एआयला प्रशिक्षित करत असला तरी हा शिष्य माणसासाठी फार थोड्या काळात वरचढ ठरत आहे. आता गेल्या काही महिन्यांत एआय स्वत: आपल्या मालकाला न जुमानता मानवी आयुष्यात ढवळाढवळ करायला लागल्यामुळे हे माणसाच्या हातात राहील का? ज्या वैद्यकीय विकासात एआयची मदत मिळेल असे वाटत होते, तो विकास होईल का? मानवी अवकाश मोहिमेसाठी एआय वेगात संशोधन करेल आणि आपण आजूबाजूच्या ग्रहताऱ्यांवर चढाई करू असे वाटत होते ते माणसाचे इप्सित साध्य होईल का? असे अनेक प्रश्न सध्या बेकाबू वागणाऱ्या एआयमुळे उपस्थित झाले आहेत.
एआय एजंट किंवा बॉट्स – एआय कंपन्यांच्या ताब्यात का राहत नाहीत? एआय सध्या उत्क्रांतीच्या मार्गावर आहे. तिचे सतत ट्रेनिंग होत आहे.
माणसाला मानवी आयुष्याबद्दल जी माहिती उपलब्ध आहे, त्याबद्दल जो डेटा उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून एआय कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणाबरोबरच अनेक कामांसाठी एआयची मदतही घेतली जात आहे. अगदी सरकारी कार्यालयातले कागदोपत्री व्यवहार असोत किंवा इराण-अमेरिका युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, एआयचा वापर सगळीकडे होत आहे. आपण विशेषत: प्रगत देशांनी एआयला माणसाच्या आयुष्यात प्रवेश दिला आहे. हा प्रवेश देताना जे प्रोटोकॉल्स पाळायला हवेत ते पाळले जात नाहीत.
आपल्या घरी काही कामांसाठी बाहेरून मदतनीस येणार असेल तर आपण जरी त्या मदतनीसांना प्रवेश दिला, तरी घरातल्या मौल्यवान वस्तू तिजोरीत, कुलुपांत ठेवतो. यातले बहुतेक लोक चांगले असतील पण काही लोक चोरीच्या उद्देशानेही आलेले असू शकतील. मग तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू जर समोर ताटात काढून ठेवल्या आणि बाहेरची माणसे काम करत असताना आपल्या वस्तूंकडे लक्षही दिले नाही तर काय होईल? अर्थात चोरी. जर ही चोरी थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही ऐनवेळी केला तर तुमचाच जीव धोक्यात येऊ शकतो. कारण चोराकडे शस्त्र असू शकते. सध्या जगात हेच सुरू आहे. आपण एआयला प्रवेश देताना कोणताही रखवालदार ठेवला नाही. कोणताही कायदा एआय कंपन्यांना किंवा एआयला थांबवू शकत नाही. कायदे बनले तेव्हा असे काही संकट येईल याची कल्पनाच नव्हती.
झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. अमेरिका आणि चीनची हीच परिस्थिती आहे. एका देशात हुकूमशाही आहे तर दुसऱ्या देशांचा प्रमुख बेबंद आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एआयमुळे काही संकट निर्माण झाले आहे हे मानायलाच नकार दिला आहे, उलट एआयचा उल्लेख सुपर इंटेलिजन्स म्हणून करा असे फर्मानही त्यांनी काढले आहे. नुकतेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केला. यात हे दोन्ही बलाढ्य राष्ट्र यावर तोडगा काढतील असे वाटले होते, पण ते झाले नाही. एआयबद्दल एकमेकांशी बोलण्यासाठी एक संवाद सेतू उभारण्याचे तेवढे ठरले आहे, जे फार परिणामकारक ठरेल असे वाटत नाही.
भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com
Read About : Hugging Face AI Agents Hack Debate: हगिंगफेस वाद
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.