Ad Advertisement Ad Advertisement

Assam Crime : आसामचा अमानुष असामी

Assam Crime : दिनांक ६ सप्टेंबर रोजी रामानुजन गोस्वामी नावाचा कॅब ड्रायव्हर स्वत:च पोलिसांना शरण आला आणि त्याने आपल्या २५ वर्षे वयाच्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. एरवी रागाच्या भरात असे निर्घृण कृत्य करणारे आणि थोड्या वेळाने भानावर आले की आपणहून पोलिसांना शरण येणारे अनेकजण आढळतात. पण, रामानुजनने केलेला खून खरोखरच रागाच्या भरात होता की पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयाचा मनात स्फोट झाला आणि नंतर त्याने थंड डोक्याने पत्नीला संपवले हे सांगणे आता कठीण आहे. कारण रामानुजनने पत्नी रियाचा ३ सप्टेंबर रोजी खून केला होता आणि तीन दिवसांनी तो पोलिसांना शरण आला होता.

रामानुजनने पत्नीचा खून करताना नुसताच राग व्यक्त केला नाही, तर स्वत:मधल्या सैतानाचे दर्शन घडवले. ३ सप्टेंबर रोजी त्यांचे भांडण झाले. त्याने तिच्यावर व्यभिचाराचा आरोप केला. भांडण वाढत गेल्यावर त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला करून तिचे शिर धडावेगळे केले. तिच्या हातापायांची बोटे छाटली. यानंतर एका पॉलिथीनच्या थैलीत तिचे शिर भरले आणि ती थैली फ्रिजमध्ये ठेवली. यानंतर घराला कुलूप ठोकून तो निघून गेला. दोन दिवस तो घराकडे फिरकला नाही. दरम्यान, त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर शेजाऱ्यांनी तक्रार केली. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना रियाचे धड सापडले. त्याजवळ एक धारदार शस्त्र मिळाले. रियाचे शिर फ्रिजमध्ये ठेवलेले आढळले. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून रियाचा मृतदेह जीएमसीएच मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात रीतसर पोस्ट मार्टेमसाठी रवाना केला. या वेळेपर्यंत पोलिसांना रामानुजन हाती लागलेला नव्हता.

पण, तीन दिवसांनी रामानुजन स्वत:च पोलिसांना शरण आला. त्याने सांगितले की, रियाचे कोणा ज्येष्ठ नागरिकाशी अवैध संबंध असल्याचे समजले होते आणि त्यामुळे त्याने रियाचा खून केला. रिया ही मूळची नूनमती गावची. तिला आई-वडील नव्हते. एक सख्खा भाऊ मात्र आहे. नूनमतीच्या फॅन्सी बाजारातील एसी मार्केट परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये ती नोकरी करीत होती. रामानुजन हा कॅब ड्रायव्हर तिला कुठे भेटला हे अद्याप ठाऊक झालेले नाही. गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी त्यांचे लग्न झाले आणि रिया आपले गाव सोडून गुवाहाटीचे उपनगर असलेल्या हाटीगावमध्ये रामानुजनच्या घरी आली. हाटीगावमध्ये वशिष्ठपूर नगरात रामानुजनचा फ्लॅट होता. घरी तो एकटाच होता. दोघांचा संसार काही महिने व्यवस्थित चालला.

कॅब ड्रायव्हर असल्याने रामानुजनची नोकरी फिरतीची होती. व्यवसायानुरूप त्याचा स्वभाव रांगडा होता. याउलट रिया ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. त्यानुसार तिचे राहणे वागणे नाजूकसाजूक आणि नखरेल असणार, त्यामुळे दोघांचे प्रेम कसे जमले हे आश्चर्यच आहे. त्यांचा जोडा अनुरूप नव्हताच आणि अशा संसारात नेहमी होते तेच अल्पावधीत घडून आले. आपण फिरतीवर असताना रियाचे कोणाशी तरी लफडे असल्याच्या संशयाने रामानुजनच्या डोक्यात घर केले. ती कोणा तरी ज्येष्ठ पुरुषाला भेटते असे त्याला समजले. तेव्हा संशय घेण्याचे कारण नव्हते. पण, हल्ली समाजात दोन नवे शब्दप्रयोग प्रचलित झाले आहेत. वृद्ध पुरुष आणि तरुण स्त्रीचे अफेअर असेल तर त्या पुरुषाला ‘शुगर डॅडी’ असे म्हटले जाते. कारण तो तिच्या बापाच्या वयाचा असला तरी तिचा प्रियकर बनलेला असतो. याउलट तरुण मुलगा आणि वयस्कर स्त्रीचे अफेअर असेल तर त्या स्त्रीला ‘शुगर मम्मी’ संबोधतात. कारण ती त्याच्या आईच्या वयाची असली तरी त्याची प्रेयसी बनून राहत असते. हे दोन्ही शब्दप्रयोग अभिरुचीहीन आहेत आणि ही नातीदेखील निषिद्ध आहेत, पण समाजात प्रचलित आहेत हे खरे.

रियाचा प्रियकर हा तिचा शुगर डॅडी असल्याबद्दल रामानुजनला संशय होता. दिनांक ३ सप्टेंबर रोजी त्याने तिला जाब विचारला. बोलाचाली झाली आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तो पळून गेला. बहुधा पुढचे तीन दिवस तो तिच्या शुगर डॅडीचा शोध घेत होता, पण तो शोध असफल झाल्यावर रामानुजन पोलिसांना शरण आला. त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी रामानुजनचा जबाब घेतला आणि त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांना तपास पूर्ण करता यावा म्हणून रामानुजनला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दिनांक ८ सप्टेंबर रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना रामानुजनने पत्रकारांसमोर काही उलटसुलट विधाने केली. तो म्हणाला, ‘मी एक वाईट कृत्य केले आहे, इतर कोणीही असे कृत्य करू नये.’ पण, तुला पश्चात्ताप होतो का असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला पश्चात्ताप होत नाही आणि मी दिलगिरी व्यक्त करीत नाही.’

१३ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपली. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला कोठडीतून बाहेर काढले. त्याला न्यायालयात हजर करायचे होते. या वेळी त्याने सरळसरळ सांगितले की, ‘इथून सुटल्यावर मी रियाच्या शुगर डॅडीला शोधून त्याला खतम करणार आहे.’ रामानुजन या बाबतीत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असावा. कारण त्यांची जीप नरकासुर टेकडी परिसरात आल्यावर पोलिसांना ढकलून त्याने जीपमधून उडी मारली, पण त्याची उडी चुकली आणि डोके फुटून तो तात्काळ मरण पावला.

शुगर डॅडी आणि शुगर मम्मी या दोन्ही संकल्पना अनुचित असल्याची यातून प्रचीती मिळाली. कारण एका कथित शुगर डॅडीचे निमित्त होऊन एक चांगला संसार उधळला गेला. त्या आगीतच पतीच्या संशयकल्लोळामुळे तेल ओतले गेले. त्यातून पंचवीस वर्षांची रिया आणि तिचा संशयी पती रामानुजन या दोघांनी प्राण गमावले.

विजय तरवडे

Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!

E-Paper: Punyanagari E-Paper


Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.