Ad Advertisement Ad Advertisement

AI & Cloud Computing : जुन्या दिग्गज कंपन्यांनी व्यवसायाचे स्वरूप बदलले

नोकिया, आयबीएम, ब्लॅकबेरी आणि एरिक्सनचे शानदार पुनरागमन

मुंबई : AI & Cloud Computing एकेकाळी जगभरातील तंत्रज्ञान आणि मोबाइल बाजारावर एकछत्री अंमल गाजवणारे नोकिया, आयबीएम, ब्लॅकबेरी आणि एरिक्सनसारखे नामांकित उद्योग आज पुन्हा एकदा जागतिक बाजारात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. स्मार्टफोन आणि वैयक्तिक संगणकाच्या (पीसी) स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर या कंपन्या बंद पडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संगणकीय जाळे (क्लाउड कॉम्प्युटिंग) आणि सायबर सुरक्षेचा स्वीकार करून या कंपन्यांनी व्यवसायाचे स्वरूपच बदलले असून, तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

१. ब्लॅकबेरी : २००० च्या दशकात आपल्या उत्कृष्ट की-बोर्ड आणि सुरक्षित ई-मेल प्रणालीमुळे ब्लॅकबेरी हा जगातील सर्वात शक्तिशाली मोबाईल ब्रँड होता. मात्र टचस्क्रीन आणि आयफोन-अँड्रॉइडच्या लाटेत कंपनीचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: कोलमडला. कंपनीने २०१६ मध्ये स्वत:चे फोन उत्पादन बंद करून प्रत्यक्ष उपकरणांऐवजी सॉफ्टवेअर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. आज ब्लॅकबेरीची क्यूएनएक्स ही अंतर्भूत कार्यप्रणाली (एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम) आधुनिक स्वयंचलित मोटारी, औद्योगिक उपकरणे आणि संरक्षण यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. अभेद्य सुरक्षा भिंत हीच ब्लॅकबेरीची खरी ताकद ठरली असून, २०२६ मध्ये अनेक वर्षांनंतर कंपनीच्या महसुलात सकारात्मक वाढ झाली आहे.

२. नोकिया : जगातील सर्वाधिक मोबाईल विकणाऱ्या नोकियाला स्मार्ट फोनच्या युगाशी वेळेत जुळवून घेता आले नाही. अखेर २०१४ मध्ये नोकियाने आपला फोन व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकला आणि दूरसंचार पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात पाऊल टाकले. अल्काटेल-ल्युसेंट आणि इन्फिनेरा या कंपन्यांचे व्यावसायिक संपादन करून नोकियाने आपले नेटवर्क साम्राज्य भक्कम केले. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय मॉडेल्स आणि डेटा सेंटर्ससाठी लागणाऱ्या अतिवेगवान प्रकाशकीय जोडणीच्या (ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी) बाजारपेठेत नोकियाचा दबदबा निर्माण झाला आहे. २०२६ च्या आकडेवारीनुसार, नोकियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय जाळे उत्पादनांच्या विक्रीत दुसऱ्या तिमाहीत तब्बल १०५ टक्क्यांची तर ऑप्टिकल नेटवर्क्स व्यवसायात २० टक्के वाढ झाली आहे.

३. आयबीएम : १९८१ मध्ये पहिला वैयक्तिक संगणक (पीसी) आणून क्रांती करणाऱ्या आयबीएमने काळाची पावले ओळखून २००५ मध्येच आपला संगणक व्यवसाय लिनोव्हा कंपनीला विकला. कमी नफा मिळवून देणारा व्यवसाय सोडल्यानंतर आयबीएमने व्यावसायिक आज्ञावली (एंटरप्राइज सॉफ्टवेअर), सेवा आणि उच्च क्षमतेच्या संगणकीय सेवांवर भर दिला. २०१९ मध्ये त्यांनी रेड हॅट ही मोठी कंपनी ३४ अब्ज डॉलरला खरेदी केली. आज मिश्र संगणकीय जाळे (हायब्रिड क्लाउड) ही आयबीएमच्या व्यवसायाचा मुख्य कणा बनली असून, २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या वितरित पायाभूत सुविधा (डिस्ट्रब्यिुटेड इन्फ्रास्ट्रक्चर) व्यवसायात ३७ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

४. एरिक्सन : एरिक्सनने २००१ मध्येच आपला मोबाईल व्यवसाय सोनी कंपनीसोबत एकत्र केला आणि नंतर स्वत:ला पूर्णपणे हँडसेट बाजारातून बाहेर काढले. आज एरिक्सन ५जी आणि पुढील पिढीच्या ६जी तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारे प्रगत रेडिओ उपकरणे, नेटवर्क सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम प्रगत मोबाइल नेटवर्क उभारणीत जगात आघाडीवर आहे.

Comments
Loading comments...