Ad Advertisement Ad Advertisement

Rent vs Buy Home : भाड्याने राहावे की स्वत:चे घर घ्यावे?

Rent vs Buy Home : आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला पडतोच. विशेषत: शहरांत घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती बघून हा निर्णय अधिकच गुंतागुंतीचा वाटतो. एका बाजूला दरमहा पंचवीस-तीस हजार रुपये भाडे देताना पैसे वाया जात असल्याची रुख-रुख लागते, तर दुसऱ्या बाजूला सत्तर-ऐंशी हजारांचा गृहकर्ज हप्ता बघून प्रेशर येते, मग नेमके काय करावे? थोडे मागे वळून इतिहासात डोकावले तर समजेल की, सुरुवातीला घर ही कोणतीही ‘गुंतवणूक’ किंवा मालमत्ता नव्हती. तो केवळ ऊन, पाऊस आणि जंगली श्वापदांपासून संरक्षण करणारा एक सुरक्षित निवारा होता. माणूस शेती करू लागला, एका ठिकाणी स्थिर झाला तेव्हा घराला माती, कुटुंब आणि वारसा जोडला गेला. पुढे राजा-महाराजांच्या काळात ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता जास्त, त्याचे वाडे आणि महाल मोठे होत गेले. आजचा मोठा बंगला आपली आर्थिक ताकद दाखवतो, तर पूर्वीचा गड-किल्ला राजकीय ताकद दाखवायचा एवढाच फरक आहे.


पण, औद्योगिक क्रांतीनंतर जग बदलले. माणूस रोजगाराच्या शोधात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ लागला. पूर्वी जिथे घर होते तिथेच आयुष्य घडायचे, आता नोकरी असेल तिथे घर शोधावे लागते. अशा वेळी शहरात जाऊन लगेच घर विकत घेणे बहुतेक लोकांना शक्य नसते, म्हणूनच भाड्याने राहणे ही केवळ आर्थिक मजबुरी राहिली नसून ती आयुष्याला एक आवश्यक ‘लवचिकता’ देणारी व्यवस्था बनली आहे.
तरीही आपल्या समाजात एक वाक्य नेहमी कानी पडते, ‘भाड्याने दिलेले पैसे म्हणजे पूर्णपणे वाया गेलेले पैसे.’
पण हे सरसकट सत्य नाही. आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, विमानाचे तिकीट काढतो किंवा गाडीत पेट्रोल भरतो, तेव्हा ते पैसे पुन्हा हातात येत नाहीत, मग आपण ते ‘वाया गेले’ असे का म्हणत नाही? कारण त्या बदल्यात आपण एक ‘सेवा’ घेतलेली असते. अगदी तसेच, भाड्याच्या बदल्यात तुम्ही राहण्याची सेवा घेत असता.

दुसरीकडे, गृहकर्ज घेतल्यावर बँकेला काय चुकवावे लागते याचा हिशेब आपण कधी करतो का? समजा, तुम्ही ऐंशी लाखांचे कर्ज वीस वर्षांसाठी साडेआठ टक्के व्याजाने घेतले, तर तुमचा मासिक हप्ता ६९,४२६ रुपये म्हणजे जवळपास एकोणसत्तर हजार रुपये होईल. वीस वर्षांत तुम्ही मुद्दलाव्यतिरिक्त तब्बल छप्पन्न-सत्तर लाखांपेक्षा जास्त व्याज फक्त बँकेला भरलेले असेल! हे व्याज तुम्हाला कधीच परत मिळणार नाही, त्यामुळे ‘भाडे म्हणजे सरळ नुकसान’ आणि ‘कर्जाचा हप्ता म्हणजे निव्वळ गुंतवणूक’ असे मानणे चुकीचे आहे.
घर घेताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, ‘ते तुम्हाला खरोखर परवडते का?’
आर्थिक नियोजनात ‘५०-३०-२०’ हा साधा नियम सांगितला जातो. पन्नास टक्के खर्च गरजेसाठी, तीस टक्के आवडीनिवडीसाठी आणि वीस टक्के बचत व गुंतवणुकीसाठी. पण, जर तुमच्या पगारातील चाळीस ते पंचेचाळीस टक्के रक्कम फक्त गृहकर्जाच्या हप्त्यात जात असेल तर इतर खर्च कसे भागवणार? अनेकदा लोक हप्ता भरण्यासाठी मुलांच्या शिक्षणाची बचत थांबवतात, निवृत्तीचे नियोजन लांबणीवर टाकतात आणि आणीबाणीचा निधी (Emergency Fund) तयार करतच नाहीत. अशा घराला kHouse Poorl म्हटले जाते. घर मोठे असते, पण घरात राहणाऱ्या माणसांचे खिसे कायम रिकामे असतात!


घर घ्यावे की नाही हे ठरवण्यासाठी घराची किंमत व वार्षिक भाडे यांचे गुणोत्तर (Price-to-Rent Ratio) हा एक उत्तम निकष आहे. समजा एका घराची किंमत एक कोटी रुपये आहे आणि त्याचे मासिक भाडे तीस हजार रुपये आहे. वार्षिक भाडे झाले साडेतीन लाख रुपये. आता एका कोटीला या साडेतीन लाखांनी भागा (गुणोत्तर येते सुमारे २८). जर हा आकडा खूप जास्त असेल, तर त्या घराच्या किमतीच्या तुलनेत भाडे खूप कमी आहे असे समजावे. अशा वेळी पैसे डाऊन पेमेंटमध्ये अडकवून मोठा हप्ता भरण्यापेक्षा, भाड्याने राहणे फायदेशीर ठरू शकते.
मग याचा अर्थ आयुष्यात कधीच घर घ्यायचे नाही का? अजिबात नाही. जर तुमचे कुटुंब एका शहरात स्थिरावले असेल, पुढील सात-दहा वर्षे तिथेच राहण्याची खात्री असेल, हप्ता अगदी सहज परवडत असेल आणि घर घेतल्यावरही इतर गुंतवणूक सुरळीत सुरू राहणार असेल तर स्वत:चे घर घेणे हा नक्कीच एक उत्तम निर्णय आहे.


फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा – वयाच्या तिसाव्या वर्षी घेतलेले घर वयाच्या पन्नासाव्या वर्षीही तुम्हाला पुरेलच असे नाही. नोकऱ्या बदलतात, मुलांच्या शाळा बदलतात, आई-वडिलांची गरज बदलते, त्यामुळे पहिलेच घर हे आयुष्यभरासाठीचे ‘ड्रीम हाऊस’ असावेच असा अट्टहास करू नका. सुरुवातीला साधे आणि परवडणारे घर घेणे नेहमीच शहाणपणाचे ठरते. शेवटी काय, घर विकत घेणे हा फक्त रिअल इस्टेटचा निर्णय नाही, तर तो तुमच्या पुढील वीस वर्षांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा निर्णय आहे. घराची किंमत किती आहे, यापेक्षा ते घर घेतल्यावर तुमचे आयुष्य किती मोकळे आणि तणावमुक्त राहते हे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वात महाग घर ते नसते ज्याची बाजारातील किंमत सर्वाधिक असते, तर तुमची बाकीची सर्व स्वप्ने आणि आर्थिक ध्येये थांबवणारे घर हेच तुमच्यासाठी सर्वांत महाग घर असते!

अभिजीत कोळपकर
संपर्क : ९५०३०८२७७८

Comments
Loading comments...