Ad Advertisement Ad Advertisement

Holiday Reasons: भारतीयांच्या सुट्टीच्या भन्नाट ( Incredible) कारणांचा सर्व्हे, वाचून व्हाल थक्क

खास प्रसंगाची गरज नाही, सासरचे नातेवाईक, शेजाऱ्यांचा त्रास, पगार आणि छोट्या यशापासून ज्योतिषाच्या शुभ मुहूर्तापर्यंत प्रवासाची भन्नाट कारणे

नवी दिल्ली : Holiday Reasons सहलीला जाण्यासाठी आता वाढदिवस, लग्न किंवा एखादा खास प्रसंग असण्याची गरज उरलेली नाही. मनात आलं की बॅग भरायची आणि निघायचं, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून भारतीयांच्या प्रवासाची काही भन्नाट कारणं समोर आली आहेत. सासरचे नातेवाईक घरी आले, शेजारी मोठा त्रास देत आहे, पगार झाला किंवा ज्योतिषाने प्रवासाचा शुभ मुहूर्त सांगितला…कारण काहीही असो, भारतीय प्रवासासाठी तयार आहेत.

५८ टक्के जण म्हणतात, मन होतं म्हणून गेलो

एका सर्वेक्षणानुसार, ५८ टक्के भारतीयांनी केवळ प्रवास करावासा वाटला म्हणून सहल केली. म्हणजेच आता सुट्टीसाठी खास कारण शोधण्यापेक्षा प्रवासाची इच्छा असणं हेच पुरेसं कारण ठरत आहे.

सासरच्यासाठी सहलीचा बेत

सर्वेक्षणातील सर्वात मजेशीर कारणांपैकी एक म्हणजे सासरच्या मंडळींचं आगमन. २८ टक्के भारतीयांनी सासरचे नातेवाईक जास्त दिवस राहायला आल्यामुळे सहलीचं नियोजन केल्याचं सांगितलं. तर ५० टक्के जणांनी कंटाळवाण्या सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहण्यासाठी प्रवास केला.

शेजाऱ्यांचा आवाजही बनला प्रवासाचा बहाणा

घरातील गोंधळापासून दूर जाण्यासाठीही भारतीय प्रवास करत आहेत. सुमार ३० टक्के लोकांनी घरकाम करणारी व्यक्ती, आया किंवा चालक सुट्टीवर गेल्यामुळे सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. तर ४६ टक्के जणांनी घराची दुरुस्ती, ड्रिलिंग किंवा शेजाऱ्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी प्रवास केला.

छोटं यश मिळालं तरी ‘चलो फिरायला’

६१ टक्के लोकांनी छोट्या-छोट्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सहल केली. कठीण आठवडा पार पडला किंवा व्यायामाचं लक्ष्य पूर्ण झालं, तरी स्वत:ला सहलीची भेट देण्याचा नवा प्रकार लोकप्रिय होत आहे.

सुमारे ५७ टक्के लोकांनी केवळ एखाद्या ठिकाणचं वातावरण आवडलं म्हणून प्रवास केला. तर १६ टक्के जणांनी पगार मिळाल्यामुळे आणि २० टक्के जणांनी आधीच्या सहलीनंतर आलेला कंटाळा दूर करण्यासाठी प्रवास केला.

ज्योतिषाने सांगितलं, प्रवास करा

सर्वात वेगळं कारण म्हणजे २२ टक्के भारतीयांनी ज्योतिषाने प्रवासासाठी शुभ वेळ असल्याचं सांगितल्यामुळे सहलीचं नियोजन केलं.
या सर्वेक्षणातून एक गोष्ट स्पष्ट होते प्रवास आता केवळ खास प्रसंगापुरता मर्यादित राहिलेला नाही. मनाला वाटलं, छोटं यश मिळालं किंवा रोजच्या धावपळीचा कंटाळा आला तरी भारतीयांची बॅग तयार आहे. थोडक्यात, आता सहलीसाठी कारण नको, कारण काहीही असो, प्रवास मात्र हवाच.

Read About : Indian Sculpture and Temple Architecture : भारतीय शिल्पकला

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...