शहर शोधल्याचा संशोधकाचा दावा अवघ्या २४ तासांत खोटा ठरला
वॉशिंग्टन : AI Maya Civilization Discovery सुट्टीवर असताना केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मेक्सिकोच्या जंगलात प्राचीन माया संस्कृतीचे एक अज्ञात शहर शोधून काढल्याचा दावा एका एआय संशोधकाने केला आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. मात्र, हे ठिकाण यापूर्वीच पारंपरिक पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी शोधून प्रसिद्ध केले असल्याचे अवघ्या २४ तासांत स्पष्ट झाल्याने विज्ञानात एआयच्या वापरावरून एक नवा वाद पेटला आहे.
पिएत्रो मिओट्टी नावाच्या एआय संशोधकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला की, पेरूमध्ये सुट्टीवर असताना त्यांनी नासाच्या सार्वजनिक लायडार डेटाचे विश्लेषण करण्यासाठी ४८ एआय एजंट्सचा वापर केला आणि मेक्सिकोमध्ये एका पिरॅमिडसह प्राचीन माया शहराचा शोध लावला. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराचे व्हायब आर्किओलॉजी असे वर्णन करत पारंपरिक संशोधकांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली होती.
परंतु, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी लगेचच या दाव्यातील फोलपणा उघडकीस आणला. अलाबामा विद्यापीठाच्या प्राध्यापिका सारा पार्काक यांनी निदर्शनास आणून दिले की, हे ठिकाण अजिबात नवीन नसून ट्युलेन विद्यापीठाचे संशोधक फ्रान्सिस्को एस्ट्राडा-बेली आणि मार्सेलो कॅन्युटो यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२५ मध्येच जर्नल ऑफ आर्किओलॉजिकल सायन्समध्ये या शहराचा सविस्तर नकाशा आणि अभ्यास प्रसिद्ध केला होता. प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. चूक लक्षात आल्यानंतर मिओट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये सुधारणा करत मूळ संशोधकांना श्रेय दिले. या घटनेमुळे विज्ञानातील एआयच्या भूमिकेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.