Ad Advertisement Ad Advertisement

Nizam-Era Wells in Marathwada : मराठवाड्यातील निजामकालीन आड

Nizam-Era Wells in Marathwada : हैदराबादच्या निजामाचे प्रशासन निश्चितच वाखणण्याजोगे असून वीसएक सचिवालयाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागा (पीडब्ल्यूबी) च्या माध्यमातून इंग्रजांच्या तोडीचे रस्ते बनवले. रेल्वे, तलाव, दुष्काळ निवारण, करोडागिरी नाके, साखर कारखाने यांसारख्या महत्त्वाच्या कामासोबत पाणीपुरवठ्यावर काम आहे.

१९११ पासून सातवा निजाम गादीवर होता. त्या कालखंडात पाण्याचे स्रोत चांगले असले तरी उन्हाळ्यात त्याची साठवणूक आणि उपलब्धता करून देणे गरजेचे असते. पारंपरिक जलसाठ्यामुळे कॉलरा, नारू यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. लोकांना शुद्ध पाणी देता यावे म्हणून निजाम सरकारने १९२८ साली कॅप्टन लिओनार्ड मून या ब्रिटिश अभियंत्याच्या नेतृत्वाखाली वेल सिंकिंग डिपार्टमेंट (पाणीपुरवठा विभाग) स्थापन केले. आज आंध्र प्रदेश, कर्नाटकसह मराठवाड्यातल्या कित्येक गावांत दिसणारे आड निजामाच्या आदर्श प्रशासनाची पावती आहे.
या आडाचे आयुष्य ८० वर्षांचे झाले तरी अजून त्याच्या प्लास्टरचा ना धपला निघाला ना राहटाचे रिबीट!

भूगर्भ शास्त्रज्ञाच्या मदतीने सर्वेक्षण झाल्यानंतर ओढा किंवा नदीकाठालगत जागा निश्चित करून बैल, ब्लास्टिंग आणि कुशल कामगाराकडून ७०० ते ८०० रुपये खर्चून बांधलेला आड वरवर ६ ते ८ फूट रुंदीचा दिसला तरी प्रत्यक्षात २० फूट रुंदीचा आहे. गरजेनुसार ३० ते ८० फुटांपर्यंत याची खोली असून दगडी बांधकाम करताना चुना आणि विटांचा चुरा म्हणजे सुर्खी, वाळू, गूळ, बेलफळ काही ठिकाणी सिमेंटचा वापर करून वरील २५ फुटांनंतर वरच्या बाजूला प्लास्टर केलेले आहे; जेणेकरून बाजूचे पाणी झिरपून आडात जाणार नाही. षटकोनी आकाराच्या आडाला गरजेनुसार अतिशय उच्च दर्जाचे ३ ते ६ पर्यंत रहाट बसवलेले आहेत. बांधकामाबाहेरचा भाग दगड, वाळू, कोळसा यांनी भरून घेतलेला आहे. नारू, कॉलरा रोगाला प्रतिबंध म्हणून आडाला पायऱ्या नसून बांधकामाची उंची जमिनीपासून ३-४ फूट ठेवलेली आहे.

बाजूचे पाणी आडात झिरपू नये म्हणून गोलाकार बांधकामाला उतार दिलेला आहे. जवळच जनावरांसाठी छोटा हौद दिलेला आहे. गावच्या लोकसंख्येनुसार एकाच गावात चार-पाच आड असू शकतात. मात्र, हरीजनांचा आड स्वतंत्र दिलेला असून कागदोपत्री तसा उल्लेख आहे. काही ठिकाणी बाजारपेठा आणि वाटसरूंसाठी रस्त्यालगत आड खोदलेले आहेत. मराठवाड्यातील आडाची निश्चित संख्या सांगता येत नाही, परंतु निजामाच्या ताब्यातील प्रत्येक गावात आड असल्याचे आढळून येतो. किंबहुना विशिष्ट प्रकारच्या या आडावरूनच हे गाव हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होते हे ओळखणे सोपे जाते. कारण निजाम संस्थानमधील आंध्र, तेलंगणा, कर्नाटक असो की मराठवाडा प्रत्येक आडाची रचना म्हणजे षटकोनी आकार, मजबूत काँक्रीट, ८० वर्षांत अगदी रिबीटही न हललेले रहाट व सध्या वापरात असलेले निजामकालीन आड पाहिल्यानंतर तत्कालीन प्रशासनाचा अंदाज येतो.

आडाचे काम नोंदणीकृत ठेकेदाराकडून करून घेत असत. काम करत असताना कोणाला इजा झाल्यास, बोट तुटल्यास, पाय तुटल्यास किती रक्कम याप्रमाणे एक रकाना दिलेला आहे. त्या त्या अवयवानुसार नुकसान भरपाईची टक्केवारी दिलेली आहे. आडाचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास आठ प्रकारची प्रमाणपत्रे जमा करावी लागत असत. काम पूर्ण झाल्यानंतर आड वापरासाठी सुरू करण्यापूर्वी संपूर्ण आड धुण्यासाठी पाच रुपये, तर रहाटाच्या पुलीला वंगण करण्यासाठी एक आणा रक्कम गावाच्या पाटलाला मिळत असे. पाटलाने आडाचे काम योग्य समाधानकारक झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ते तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर म्हणजे लोकल फंड यंत्रणेकडे जाऊन शेवटी तालुकादार म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने कंत्राटदाराला बिल मिळायचे.
१९२८ पासून तयार झालेल्या आडावर ९ इंच रुंद आणि २ फूट उंचीच्या शिलालेखावर पाच ओळी आहेत.

१. H.E.H. NIZAMAS – ही निजामाची पदवी हिज एग्झाल्टेड हाइनेस निजाम.
२. डब्ल्यूएसडी – वेल सिंकिंग डिपार्टमेंट (विहीर खोदकाम विभाग).
३. १३५१ एफ – हे मुस्लिम कालगणणेतील फसली वर्ष असून यात ५९० मिसळल्यास चालू वर्ष निघते. (प्रत्येक विहिरीवर वेगळे असू शकते).
४. टी. एन. २७ किंवा टी. आर. २७ – या ठिकाणी ‘टी’ हे तालुक्याचे ठिकाण (येथे टी म्हणजे तुळजापूर) एन. म्हणजे नवीन आड, जर टीआर असेलतर तुळजापूर तालुक्यातील रिनीवल म्हणजे जुन्या आडाला दुरुस्ती करून बांधलेला नवीन आड. या दोन्ही अक्षराच्या पुढे असणारा क्रमांक तालुक्यातील आड क्रमांक आहे.
५. डी-४४ – डी म्हणजे डेफ्थ अर्थात आडाची खोली अर्थात पुढील ४४ चा आकडा ही आडाची फुटामध्ये खोली दाखवते, तर त्यापुढील अंक हा जिल्ह्यातील किती क्रमांकाचा आड दर्शवणारा क्रमांक आहे.

त्यानुसार मराठवाड्यातील प्रत्येक गावात दिसणारा आड हा आज किमान ९० ते शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचा असून बरेच आड आजही वापरात आहेत. वापरात नसला तरी अद्यापी त्याला काहीही झालेले नाही. याउपर कोणतीही आधुनिक उपकरणे न घेता पारंपरिक हत्याराने सदर आडाला किरकोळ स्वरूपात तोडून दाखविल्यास कितीही बक्षीस ठेवले तरी त्याच्यावर किरकोळ डागही पडत नाही. शंभर वर्षांपूर्वी ८५% हिंदू प्रजेवर राज्य करणारा मुस्लिम राजा सातवा निजाम या अर्थाने वेगळा वाटतो. परंतु, निजामाकडे असलेल्या प्रशासकीय यंत्रणेत असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यामुळे हे घडून आलेले आहे.

त्यापैकीच एक विहीर खोदकाम विभागाचा प्रमुख म्हणून १९२८ – १९३५ दरम्यान कार्यरत असणारा अभियंता कॅप्टन लिओनार्ड मून हा त्याची बुद्धिमत्ता आपल्यासाठी खर्चून गेला. दुष्काळी भागात काम करता यावे म्हणून आपले कार्यालय कर्नाटकातील लिंगसुगूर येथे ठेवल्याने १९३५ रोजी त्यांचे निधन झाले. याच ठिकाणी त्यांची समाधी असून त्यावर- सावीरा भावी सरदार हे वाक्य लिहिलेले आहे. कन्नडमधील वाक्याचा अर्थ आहे, हजार विहिरी बांधणारा सरदार. अर्थातच, लोकांनी मूनला दिलेली ती एक उपाधी आहे. शक्य असेल त्यांनी आपल्या आडावर जा आणि पहा काय लिहिलेले आहे ते? कदाचित याच आडावर आपल्या वाडवडिलांनी पाणी भरलेले असेल.

सतीश कदम
संपर्क : ९४२२६५००४४

Read About : India Economic Growth and Self-Reliance 2026: आरसा आणि प्रतिमा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.