India Nepal Relations : शेजारी बदलता येत नाहीत, मात्र शेजाऱ्यांशी असलेले संबंध संवाद, विश्वास आणि सहकार्याच्या बळावर अधिक दृढ नक्कीच करता येतात. दक्षिण आशियाई राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भारताने नेहमीच ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा पुरस्कार केला आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने नवी दिल्लीत झालेली द्विपक्षीय चर्चा आणि त्यातून आकाराला आलेले २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे भरीव विकास सहकार्य पॅकेज, हा दोन्ही देशांतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना नवी उभारी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. महाप्रलयकारी पूर आणि भूकंपाच्या संकटाने ग्रासलेल्या नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी भारताने उचललेले पाऊल केवळ आर्थिक मदत नसून, ती संकटाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या खऱ्या मित्राची संवेदनशीलता आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील नाते केवळ राजनैतिक करारांपुरते मर्यादित नाही; त्याला शेकडो वर्षांचा सांस्कृतिक, धार्मिक आणि भावनिक वारसा लाभलेला आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी या दौऱ्यात काढलेले उद्गार या नात्याची खोली नेमकेपणाने अधोरेखित करतात. भारत आणि नेपाळचे संबंध हिमालयासारखे मजबूत आणि महासागरांसारखे विशाल आहेत, तसेच नैसर्गिक आपत्ती व कठीण प्रसंगी भारत नेहमीच एक विश्वासू शेजारी म्हणून सर्वप्रथम मदतीला धावून आला आहे, ही त्यांची भावना अत्यंत बोलकी आहे. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे आणि बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे या पारंपरिक नात्यात काहीसा दुरावा निर्माण करण्याचे प्रयास झाले होते. तत्राप, परस्पर आदर, अतूट विश्वास आणि सातत्यपूर्ण सद्भावना हेच दोन्ही देशांच्या संबंधांचे खरे आधारस्तंभ आहेत, हे या दौऱ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे पॅकेज हे नेपाळच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी ठरणारे आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे नेपाळची पायाभूत व्यवस्था आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. अशा कठीण समयी कोणत्याही अटींशिवाय आणि केवळ लोककल्याणाच्या भावनेतून भारताने दिलेला मदतीचा हात नेपाळमधील सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकणारा आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात केवळ आर्थिक मदतीची घोषणा न होता शिक्षण, अंतराळ संशोधन, सुरक्षा, प्रशासन, आरोग्य, शहरी विकास आणि पारंपरिक वैद्यकीय शास्त्र अशा विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती नेपाळच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे, तर पारंपरिक वैद्यकीय शास्त्र आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या दौऱ्यातील सर्वांत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूरधामदरम्यान सीमापार प्रवासी रेल्वे सेवेला दाखवलेला हिरवा कंदील होय. प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्या ऐतिहासिक बंधामुळे जोडली गेलेली ही दोन तीर्थक्षेत्रे आता आधुनिक रेल्वे मार्गाने अधिक जवळ येणार आहेत. यामुळे केवळ धार्मिक पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांमधील दळणवळण सुलभ होऊन व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे नवे मार्ग खुले होतील. याशिवाय, नेपाळमधील भारतपुरस्कृत अनेक प्रकल्पांची डिजिटल माध्यमातून झालेली पायाभरणी ही दोन्ही देशांतील कामाची गती आणि पारदर्शकता दर्शवते.
दक्षिण आशियाच्या भू-राजकीय पटलावर शांतता, स्थैर्य आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यातील सुसंवाद अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या सीमा खुल्या असल्याने सुरक्षा आणि प्रशासकीय पातळीवर परस्पर समन्वय असणे ही काळाची गरज आहे. या नव्या करारांमुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल. तसेच, तरुण नेतृत्व असलेल्या बालेंद्र शाह यांच्यासारख्या नेत्याने भारताच्या विकासात्मक दृष्टीकोनाशी सुसंगत भूमिका घेतल्याने आगामी काळात द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक व्यावहारिकता आणि गतिमानता पाहायला मिळेल, यात शंका नाही.
कोणत्याही दोन शेजारी राष्ट्रांमधील मैत्री तेव्हाच चिरस्थायी ठरते, जेव्हा ती केवळ सत्ताधाऱ्यांपुरती मर्यादित न राहता दोन्ही देशांच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. भारताने नेपाळसाठी उघडलेले सहकार्याचे हे नवे दालन नेपाळच्या पुनर्निर्माणासोबतच संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्राच्या प्रगतीला गती देणारे ठरेल. संकटात सापडलेल्या मित्राचा हात घट्ट धरून त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देण्याची भारताची ही भूमिका जागतिक राजकारणातही आदर्शवत आहे.
परस्पर विश्वासाच्या या भक्कम पायावर भारत आणि नेपाळच्या मैत्रीचे हे नवे पर्व अधिक यशस्वी आणि समृद्ध ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आपत्तीच्या काळात मदतीसाठी तत्पर राहणे आणि विकासाच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून चालणे, हाच खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा शेजारधर्म’ आहे. या नव्या उपक्रमांमुळे दोन्ही देशांतील परस्पर सौहार्द अधिक गहिरे होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांना नवे बळ मिळेल. या सकारात्मक प्रवासातून भारत-नेपाळ संबंधांचा एक नवा आणि आश्वासक अध्याय निश्चितच लिहिला जाईल, याच शंका नसावी!
Read About : Welfare Scheme Fraud : वंचितांच्या हक्कावर डल्ला
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.