Ad Advertisement Ad Advertisement

अर्थसंकल्प 2027-28 मध्ये एआय ट्रान्सफॉर्मेशन फंड आणि कर सुधारणांची नॅसकॉमची मागणी – AI Transformation Fund

एआय नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि औपचारिक रोजगाराला प्राधान्य द्या

नवी दिल्ली : AI Transformation Fund आयटी क्षेत्राची शिखर संघटना असलेल्या नॅसकॉमने आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२७-२८ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित बदल, सायबर सुरक्षा, करप्रणालीतील स्पष्टता आणि औपचारिक रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. अर्थसंकल्पपूर्व शिफारशींमध्ये नॅसकॉमने म्हटले आहे की, एआयमुळे तंत्रज्ञानाची मागणी, व्यवसाय मॉडेल आणि रोजगाराचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान अधिक भक्कम करणे आवश्यक आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ट्रान्सफर प्राइसिंग उपाययोजना पुढे नेत, आता तंत्रज्ञान नवोपक्रम, कार्यबलातील बदल आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सच्या (जीसीसी) विकासाला चालना दिली पाहिजे.

प्रमुख मागण्या आणि शिफारशी

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाने संयुक्तपणे तीन वर्षांच्या कालावधीसाठी एआय सेवा परिवर्तन आणि नवोपक्रम योजना सुरू करावी. यातून एआय आधारित उत्पादने आणि सेवांच्या व्यावसायिक विकासाला पाठबळ मिळेल, तसेच कर्मचाऱ्यांना नवीन एआय भूमिकांसाठी प्रशिक्षित करणे सोपे होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) जागतिक तंत्रज्ञान साखळीचा भाग बनत असल्याने त्यांची सायबर सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी सरकारने समर्पित कार्यक्रम राबवावा.

जीसीसी इकोसिस्टममध्ये परदेशी तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या भेटींमुळे निर्माण होणारे स्थायी आस्थापना (परमनंट एस्टॅब्लिशमेंट) संबंधित करवाद टाळण्यासाठी स्पष्ट नियम तयार करावेत. बिगर-सूचीबद्ध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना शेअर्स वाटप करताना कर न आकारता, शेअर्सची विक्री किंवा कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होईपर्यंत कर भुगतान पुढे ढकलावे.

रोजगार व कॉर्पोरेट सुधारणा

रोजगारनिगडित कर सवलतींसाठी वेतन पात्रता मर्यादा २५,००० रुपयांवरून १ लाख रुपये प्रति महिना करावी, जी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेशी सुसंगत असेल. तसेच कंपन्यांचे विलीनीकरण (मर्जर) आणि विलगीकरण (डीमर्जर) कर-तटस्थ ठेवून करवाद निवारण प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. या सुधारणांमुळे एआयचा स्वीकार वेगाने होईल, औपचारिक रोजगार वाढतील आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित होऊन भारत एक प्रमुख तंत्रज्ञान व नवोपक्रम केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास टेक उद्योगाने व्यक्त केला आहे.

Read About : ST Smart Card Recharge : आता फक्त 5 रुपयांत एसटी स्मार्ट कार्ड रिचार्ज; महिलांना मोठा दिलासा!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.